लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तब्बल ६५० कोटींचे घरचे बियाणे वापरले, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
राज्यातील खरीप हंगामात कापूस, साेयाबीन तसेच कडधान्यांचे लागवड क्षेत्र वाढले. या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम सुरू केली. या मोहिमेतून सुमारे ६,५०० कोटींचे ३१ लाख क्विंटल बियाणे तयार झाले. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३९ लाख हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात ४३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के राहावा, असे लक्ष्यांक होते. यानुसार शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरतील, असेही गृहीतक ठेवण्यात आले. राज्यातील बियाणे बाजारात यंदा ११ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज होती. ही गरज पाहून महाबीजने २.१० लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ८ हजार क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांनी ९ लाख ६५ हजार क्विटल बियाणे पुरवावे, असे नियोजन केले होते. खासगी बाजारात बियाणांचा पुरवठा मर्यादित होता. दुसरीकडे पेराही वाढत होता. मात्र, शेतकऱ्यांनी घरचे ३१ लाख क्विंटल बियाणे वापरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा बंपर पेरा होऊनसुद्धा बियाणे टंचाई जाणवली नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
शेतकऱ्यांनी विकत घेण्याऐवजी घरचेच बियाणे वापरले आहे. यातून बियाणांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचला. राज्यातील बीजोत्पादन अभियानाचे हे यश आहे.
-दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, पुणे