सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याच्या दफ्तर दिरंगाई आणि अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन सास्ती येथील आशा तुळशीराम घटे या युवतीने आत्महत्या केली. अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. आशाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला.
वेकोलिच्या त्या क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याने आपल्या कक्षात बोलून त्या मुलीला परिवारासमोर अपमानित करणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, सातबारावर आजोबा आणि वडिलांचे नाव असून त्यांनी मुलीला नोकरीकरिता संमती दिली असताना तिच्या आईला आपल्यासमक्ष आणण्याचा अट्टाहास त्या वेकोलि अधिकाऱ्यांनी का केला, असा सवालही अहीर यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात राजुरा पोलीस स्टेशनला पुल्लया यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून, त्यांना क्षेत्रीय नियोजन अधिकारी या पदावरून तात्काळ हटविण्यात यावे आणि कागदपत्रांची माहिती असणारा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य करीत त्यांना योग्य मार्गदर्शन देणारा अधिकारी पुल्लया यांना हटवून त्या जागेवर द्यावा, अशी सूचनावजा मागणी हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रशासनाकडे केली आहे.