मेंडकी : गेल्या १० दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने गावकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री या बिबट्याने चक्क मेंडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारच ठिय्या दिला. गावकऱ्यांनी नंतर त्याला तेथून पिटाळून लावले. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास हा बिबट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर आला. आरोग्य केंद्राच्या आवारात गुुलमोहराची झाडे आहेत. या झाडांवर आश्रय घेऊन असलेल्या दोन वानरांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा बिबट तिथे आला होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. याचवेळी आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी तेथे गेले असता, त्यांना हा बिबट दिसून आला. या कर्मचाऱ्यांनी त्याला तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून न जाता बिबट गुलमोहराच्या झाडावर चढला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करुन गावकऱ्यांना तिथे बोलावले. मात्र, तरीही बिबट तिथेच थांबून होता. वनाधिकाऱ्यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. रात्री उशीरा बिबट तेथून जंगलाकडे निघून गेला. गेल्या दहा दिवसांत या बिबट्याने परिसरातील शेतांमध्ये अनेकांना दर्शन दिले. त्याचा याच परिसरात वावर असून दुर्घटना घडण्याआधी बंदोबस्त करावा. (वार्ताहर)
बिबट्याच्या दर्शनाने मेंडकीवासी दहशतीत
By admin | Published: November 22, 2014 12:30 AM