चंद्रपूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देणारी जिल्ह्यात सात खासगी आणि सहा शासकीय अशी एकूण १३ रुग्णालये आहेत. त्यापैकी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी दोन शासकीय व चार कोविड रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी आतापर्यंत आढळलेल्या ७८ हजार रुग्णांपैकी केवळ ७७२ रुग्णांनाच मोफत उपचार देण्यात आला आहे. यावरून रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय चिमूर या दोन शासकीय रुग्णालयात तर क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर, मुसळे हॉस्पिटल चंद्रपूर, ख्रिस्तानंद कोविड हॉस्पिटल ब्रह्मपुरी, मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर या खासगी रुग्णालयाला कोरोना रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास परवानगी दिली आहे. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यातील केशरी, पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आदी शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. योजनेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे ४९४, उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे २८, क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे १७४, मुसळे हॉस्पिटल येथे १४, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे ६२ जणांना मोफत लाभ देण्यात आले आहे. तर मानवटकर हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत एकाही रुग्णालयाला या योजनेंतर्गत लाभ देण्यात आला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत ७८ हजाराच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी केवळ ७७२ जणांनाच लाभ मिळाल्याने या योजनेचा लाभ देण्यास रुग्णालयाला वावडे आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
२० प्रकारच्या पॅकेजचा अंर्तभाव
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शासनाकडून रुग्णालयाला २० प्रकारच्या पॅकेजचा अंर्तभाग केला आहे. यामध्ये जर रुग्ण ओ टू किंवा साधारण स्थितीत असल्यास २० हजार, रुग्ण बायपॅपवर असेल तर ४० हजार आणि रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर ८० हजार याप्रमाणे २० प्रकारच्या पॅकेजचा अंर्तभाग केला आहे.
बॉक्स
लाभाकरिता अशी करा नोंदणी
या योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. या योजनेच्या अमंलबजावणी करिता रुग्णालयात आरोग्य मित्राचे कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यांच्या आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्र देऊन नोंदणी करता येते.
बॉक्स
तर करा तक्रार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट तथा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी योजनेंतर्गत रुग्णास उपचार नाकारल्या रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडे लेखी तक्रार करता येते. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुम नंबर २ येथील जनआरोग्य योजनेतील जिल्हा कार्यालयात तक्रार करता येते.
बॉक्स
उपचाराकरिता शेती विका, व्याजाने पैसे काढ
खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम लाटली जात आहे. याबाबत चंद्रपूर येथील एका हॉस्पिटलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली होती. उपचारासाठी अनेकजण आपली शेती गहाण टाकून किंवा विकून पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. तर काहीजण व्याजाने पैसे काढून रुग्णालयाचे बिल देत आहेत. त्यामुळे या योजनेला व्यापक स्वरुप देणे गरजेचे आहे.
बॉक्स
मानवटकर रुग्णालयात योजनेंतर्गत उपचार नाही
येथील मानवटकर हॉस्पिटलला कोविड रुग्णांवर जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप एकही रुग्णांवर या योजनेंतर्गत उपचार करण्यात आला नाही. त्यांना याबाबत संबंधित विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस ही बजावली असून पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.