सिंदेवाही : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असताना तालुक्यात टायफाॅइड आजार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालये हाऊसफुल झालेले दिसत आहेत.
शहर व तालुक्यात सर्दी, खोकला, ताप, अशा रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. उपचारासाठी नागरिकांची खाजगी व ग्रामीण रुग्णालयात दररोज गर्दी होत आहे. ग्रामीण रुग्णालयात रोज १०० ते १२५ रुग्ण येऊन तपासणी करीत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे असे की, शहरासह तालुक्यात वातावरणात बदल झाल्याने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे आजार बळावत आहे. ग्रामीण भागात अंगदुखीचे रुग्ण तसेच लहान मुले, ज्येष्ठांमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, खोकला दिसून येत आहे. पावसाळ्यात अनेक जण आहाराविषयी खबरदारी घेत नाहीत. तालुक्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. याशिवाय सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने टायफाॅइड, मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत.