जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. परिणामी, आरोग्य सुविधा कोलमडून पडल्या. कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक इंजेक्शन्सचा मोठा तुटवडा निर्माण झाला. रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. उपचाराअभावी हॉस्पिटलबाहेर ताटकळत राहावे लागत आहे. खासगी हॉस्पिटलमध्येही हीच स्थिती असल्याने मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळे तेलंगणातील करीमनगर, आसिफाबाद व आदिलाबाद येथील हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करावे, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
तेलंगणात मुबलक आरोग्य सुविधा
चंद्रपूरपासून ६५ किमीवर तेलंगणा राज्यातील आसिफाबाद, ११० किमी अंतरावर आदिलाबाद व १५० किमी अंतरावर करीमनगर ही जिल्हास्थळे आहेत. याठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अतिशय कमी आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवगळता हॉस्पिटलमध्ये मुबलक खाटा, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजन पाईपलाईन व सर्वच पायाभूत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, याकडेही आमदार मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकारने सामंजस्य करार करावा
तीन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने ३६ रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्या माध्यमातून अथवा वातानुकुलित अन्य बसेसमधून रुग्णांना तेलंगणातील हॉस्पिटल्समध्ये दाखल करता येऊ शकते. यादृष्टीने नियमातील तरतुदी तपासून महाराष्ट्र सरकारने तेलंगणा सरकारशी सामंजस्य करार करावा, अशीही सूचना आमदार मुनगंटीवार यांनी केली.
कोट
तेलंगणा राज्यातील हॉस्पिटल्स चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्ध झाल्यास कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल. यासंदर्भात तेलंगणाचे वित्तमंत्री हरीश राव यांच्याशी मी चर्चा केली. महाराष्ट्र सरकारकडून याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत त्यांनी चर्चेदरम्यान आश्वस्त केले आहे.
- सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष विधिमंडळ लोकलेखा तथा आमदार
कोट
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तेलंगणातील हॉस्पिटल्स उपलब्धतेसंदर्भात प्रशासनालाही सूचना केली आहे. कोविड १९ वर मात करण्यासाठी या सूचनेचे महत्त्व लक्षात घेऊन तेलंगणातील आरोग्य सुविधा, कोविड रुग्णालय, ऑक्सिजन प्लान्ट व अन्य सुविधांविषयी माहिती काढण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर