लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विकास विभागाकडून मागील तीन वर्षांचे प्रलंबित सर्व शुल्क व प्रवास भाड्याची थकीत रक्कम अजूनही मिळाली नाही. त्यामुळे दिवाळी सुट्टीत वसतिगृहे सुरू होणार नाहीत, असा निर्णय नामांकित शाळा संघटनेने घेतला आहे. त्यामळे सध्या तरी नामांकित शाळांची वसतिगृहे बंदच राहतील, असे चित्र आहे.नामांकित इंग्रजी शाळा ट्रस्टी असोसिएशनची बैठक नुकतीच नाशिक येथे पार पडली. या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांचे प्रलंबित संपूर्ण शुल्क तसेच थकीत सर्व प्रवास भाडे बील मिळाल्याशिवाय दिवाळी नंतर कुणीही वसतिगृहे सुरू करणार नाही तसेच नामांकित योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत आणणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर या आशयाचे निवेदन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनाही देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संस्थाचालक तथा ब्रम्हा व्हॅली स्कूलचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हे होते. यावेळी विश्वात्मक जंगली महाराज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे-पाटील, संघटनेचे अध्यक्ष मनोज हिरे, संस्थापक अध्यक्ष अनिल रहाणे, सचिव डॉ. सुधीर जगताप, समन नाथांनी, रवींद्र पाटील होते. मनोज हिरे, अनिल रहाणे, समन नाथांनी, रवींद्र पाटील, डॉ. जगताप, राजाभाऊ देशमुख, चंदन पाटील, दिलीप पाटील, कैलास जैन, साहेबराव घाडगे, नंदकुमार सूर्यवंशी, राजाराम पानगव्हाणे आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण तसेच अन्य मार्गाने आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी दत्तात्रय वाणी, चंदन पाटील, दिलीप पाटील, राजाभाऊ देशमुख, आशितोष पिसे, चोकसे, डॉ. धनंजय गायकवाड, प्रशांत वीर, देवमान माळी, कैलास जैन, दिनकर देवरे, डुबे, डॉ. नंनरवरे, अष्टेकर यांच्यासह अनेक संस्थाचालक उपस्थित होते. प्रास्ताविक आशुतोष पिसे, स्वागत दत्तात्रय वांढेकर, तर आभार दत्तात्रय वाणी यांनी मानले.
शासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचेविद्यार्थी, पालकांनी वेठीस धरण्याचा शाळांचा अजिबात हेतू नाही; पण आर्थिक अडचणीमुळे वसतिगृह सुरूच करू शकत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देवून त्वरित थकलेले अनुदान देणे गरजेचे आहे. शासनाने मागणी पूर्ण न केल्यास पुढील काळात ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.-दिलीप झाडे, सदस्य, संस्थाचालक संघटना
आंदोलन होणार तीव्र संस्थाचालकांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी ७ व ८ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरविण्यात आले. थकीत प्रवास भाडे, एक महिन्याच्या आत न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशित न करण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील या शाळांचे अडले अनुदान- स्कॉलर्स सर्च ॲकॅडमी, कोरपना- गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर- देवयानी इंटरनॅशनल स्कूल, सिंदेवाही- फैरी ल्यांड स्कूल, भद्रावती- इंदिरा गांधी स्कूल, राजुरा- ट्विंकल स्कूल, नागभीड