लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासोबतच यंदा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा जुने दु:ख विसरून सध्या तरी आनंदात आहे. मागील दोन-तीन वर्षांचे नुकसान विसरून तो पुन्हा नव्या उमेदीने मान्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. पारा ४५-४६ अंशापार गेला आहे. तरीही बळीराजा तप्त उन्हात पुन्हा आपल्या शेतात दिसू लागला आहे.मागील दोन वर्ष सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरीपाने शेतकºयांना दगा दिला. मागील वर्षी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पावसाचे आगमन झाले नाही. त्यानंतर पाऊस बरसला आणि शेतकºयांनी पिकांची लगबगीने पेरणी केली. मात्र नंतर पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. काही कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कापसावर बोंडअळी आणि धानावर मावा-तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. संपूर्ण पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले. त्यामुळे पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला.यावर्षी प्रारंभापासून हवामान खात्याकडून पावसाबाबत चांगला अंदाज वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या अंदाजावरून मे महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. असे झाले तर जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रीय होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच आनंदात आहे.यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यंदातरी चांगले पीक हाती येईल आणि आर्थिक परिस्थिती संकटातून बाहेर पडेल, या आशेने शेतकरी नव्या दमाने कामाला लागला आहे.हंगामपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. सुर्याचा पारा ४६ अंशापार गेला आहे. तरीही पोटाची खळगी बळीराजाला घरी स्वस्थ बसू देत नसल्याने तो तप्त उन्हातही शेतात राबताना दिसून येत आहे. शेतातील कचरा, अनावश्यक झुडुपे तोडणे, ताटव्याचे कम्पाऊंड बांधणे, बांध्या व्यवस्थित करणे, शेतात शेणाचे खत टाकणे, नांगर, वखर व्यवस्थित करून ठेवणे आदी कामे शेतकरी करीत असताना दिसून येत आहे.कर्जासाठी धावपळखरीप हंगाम तोंडावर असला तरी शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. मागील खरीप हंगामात निम्मेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे लागवडीकरिता झालेला खर्चही भरून निघाला नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अनेकांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पुढील खरीप हंगाम सुरू होत असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झालेला नाही. शेतकरी वारंवार बँकेत जाऊन विचारपूस करतात. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. खरीप हंगामासाठी त्याला पुन्हा पैशाची गरज आहे. मागचे कर्जाचे ओझे डोक्यावर आहेच. तरीही बळीराजा कर्जासाठी पुन्हा बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. काही शेतकरी तर पुन्हा नाईलाजाने सावकरांकडे याचना करताना दिसत आहेत.पावसाने दगा दिला तर...हवामान खात्याचा अंदाज नेहमीच वरुणराजाने चुकविला आहे. आपल्या लहरीपणाचा प्रत्यय त्याने वारंवार दिला आहे. त्यामुळे यावेळी पावसाने दगा दिला तर शेतकºयांचे हाल काय होतील, याचा विचार न केलेलाच बरा. सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत नाजुक आहे. त्याला उभे राहण्यासाठी यंदाचा खरीप हंगाम बरा जाणे अपेक्षित आहे. असे झाले नाही तर शेतकरी देशोधडीला लागेल आणि त्याला कुणीही वाचवू शकणार नाही.
तप्त उन्हात शेतकरी पुन्हा शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:28 AM
मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासोबतच यंदा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा जुने दु:ख विसरून सध्या तरी आनंदात आहे.
ठळक मुद्देपैशाची जुळवाजुळव : हंगामपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ