आवाळपूर : कोरपना तालुक्यातील आवाळपूरनजीक असलेले हिरापूर गाव कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाले आहे. येथील अनेक कुटुंबांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आवाळपूर, बीबी, नांदाफाटा हा औद्यागिक परिसर आधीच हाॅटस्पाॅट असून, २० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिरापूरचा वाढता संसर्ग पाहता परिसरातील नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण बाहेर पडू नये, अशा सूचना वारंवार ग्रामपंचायतीकडून देण्यात येत असतानाही नागरिक विनाकारण बाहेर फिरून कोरोनाला आमंत्रण देऊन स्वत:चा व परिवाराचा जीव धोक्यात टाकत आहेत.
बॉक्स
ग्रामीण भागात होम आयसोलेशन धोकादायक
कोविड आजाराची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना गृहविलगीकरणात राहण्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे स्वत:ची वेगळी खोली, वेगळे बाथरूम, वेगळे शौचालय नाही. यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांच्या कुटुंबांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. होम आयसोलेशनमुळेच औद्योगिक परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून, आता ग्रामीण भागातही धोकादायक परिस्थिती आहे.
बॉक्स
ग्रामपंचायतीने घ्यावा पुढाकार
गावागावात आता कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने गावातील नागरिकांना सुरक्षित राहावे याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे, तसेच गावस्तरावर गृहविलगीकरणाची पर्यायी व्यवस्था करावी, तसेच गावात गठित केलेली कोविड-१९ समिती कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.