पळसगाव (पिपर्डा) : संततधार पावसामुळे चिमूर तालुक्यातील शिवनपायली, लावरी गावामधील घरे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी नवतळा येथील माजी उपसरपंच भाजप तालुका उपाध्यक्ष महादेव कोकोडे यांनी केली आहे.
चिमूर तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शिवनपायली येथील महेश तुमराम, विकास रामदास पोइनकर, श्रीकृष्ण लोनबले यांच्यासह बहुसंख्य घरांची पडझड झाली आहे. शिवाय शेतपिकांनाही त्याचा फटका बसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी आहे. घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे खोलगट भागातील शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही शेतात पाणीच पाणी असल्याने उभे पीक पिवळे पडत आहे. दसरा-दिवाळी सणाचे दिवस जवळ आले असताना तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने चिमूर तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे मत माजी उपसरपंच महादेव कोकोडे यांनी व्यक्त केले.
210921\img-20210921-wa0090.jpg
संततधार पाऊसमुळे घराची पडझड नुकसान भरपाई देण्याची माजी उपसरपंच महादेव कोकोडे यांची मागणी