उदय गडकरी
सावली : सध्या कोविडने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. शासनाने गावागावात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील लोक लसीकरणासाठी घाबरत होते. शनिवारी हिरापूर येथे लसीकरण घेण्यात आले. सुरुवातीला लोकांचा सहभाग अल्प होता. तेवढ्यात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे, यांनी हिरापूर येथे लसीकरण केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान प्रतिसाद अल्प असल्याचे दिसून आल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन संपूर्ण हिरापूर गाव पिंजून काढला.
या दरम्यान त्यांनी कोरोना लस लोक का घेत नाहीत, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोरोना लसीचे महत्त्व प्रत्यक्ष लोकांना घरोघरी जाऊन समजावून सांगितले. नागरिकांनी तहसीलदार यांच्या आवाहनाला व मार्गदर्शनाला दाद देत कोविडची लस घेण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे ४२ लोकांनी लस घेतली. दरम्यान सावलीचे तहसीलदार यांनी कोविडच्या काळात अनेक लोकपयोगी धोरणे आखली आहेत. मागील आठवड्यात त्यांनी राईस मिल, गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन व इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून कोविड १९ साठी मदत मागितली होती. नागरिकांनीसुध्दा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. यादरम्यान नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे यांनी लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी हिरापूरच्या सरपंच प्रीती गोहणे, उपसरपंच शरद कन्नाके, संजय सायंत्रावार, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस नितीन गोहणे उपस्थित होते.
===Photopath===
300521\img-20210529-wa0268.jpg
===Caption===
तहसीलदार व ईतर अधीकारी प्रत्यक्ष भेट देत गावकऱ्यांना समजावून सांगताना