विद्यार्थ्यांनी समजून घेतली कार्यपद्धती : पोलीस स्थापना दिनाचे निमित्त चंद्रपूर : पोलीस आणि नागरिकांमधील रुंदावलेली दरी कमी व्हावी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती माहीत व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाते. ‘कठोर’ एवढीच त्यांची ओळख बहुतांश विद्यार्थी तसेच नागरिकांना माहित आहे. यानंतरही पोलिसांचे अनेक कामे असतात ही माहिती आजही सामान्य नागरिकांना नाही. कार्यपद्धतीने सर्वसामान्यांना माहिती होण्यासाठी पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे.या अनुषंगाने येथील लोकमान्य कन्या शाळेतील विद्यार्थिंनी पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला सेल, नक्षल सेल, सायबर सेलला भेट दिली. शाखेच्या कामकाजाबाबत पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी माहिती दिली.एरवी कठोरपणे वागणारे पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत मार्गदर्शन करीत होते. एफआयआर म्हणजे काय, फिंगर प्रिंट कुणाचे आणि कशासाठी घेतले जातात, गुन्हेशाखेचे कामकाज कसे चालते आदी प्रश्न विद्यार्थिंनींनी उपस्थित केले. या सर्व प्रश्नांचे पोलीस अधिक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांनी उत्तर देत विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याविषयीची माहिती दिली. पोलीस मुख्यालयातील आरएसआय दलाई यांनी शस्त्रासंबंधी माहिती दिली.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी वाहतूकीचे नियम सांगितले. एवढेच नाही तर नव्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंबंधीही माहिती दिली. विद्यार्थ्यांना महिला अत्याचार प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या व त्याअनुषंगाने सुरक्षेचे उपाय यावरही माहिती देण्यात आली. एफआयआर म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, फिंगर प्रिंट कुणाचे घेतले जातात, गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो, वाचक शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, सायबर क्राईम, यांची जबाबदारी काय, त्याची माहिती समजावून सांगितली. घुग्घुस येथे जनता व प्रियदशर्शीनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडून सुरक्षा, कायदा सुव्यवस्था,दंगा नियंत्रण व महिला पोलीस भरती या बरोबरच अन्य कामकाजा विषयी माहिती दिली. ठाणेदार मनिष ठाकरे यांनी पोलीस विभागाकडून दैनंदिन कामकाजाची माहिती दिली.(नगर प्रतिनिधी)
पोलिसांचे कसे चालते कामकाज?
By admin | Published: January 04, 2015 11:08 PM