लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघांच्या शिकारप्रकरणी चंद्रपूरवनविभागाकडून मंगळवारी (दि. २५) तब्बल एक हजार पानांचे आरोपपत्र राजुरा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दाखल करण्यात आला. वाघांच्या शिकारीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि अवयवांचा बेकायदेशीर व्यापार कसा चालतो, याबाबत धक्कादायक बाबी या अहवालात नमूद असल्याची माहिती सूत्राने दिली. या प्रकरणात आतापर्यंत २९ जणांची आरोपी म्हणून ओळख पटवण्यात आली. त्यापैकी १३ जणांना अटक झाली आहे.
राजुरा तालुक्यातून जानेवारी महिन्यात वनविभागाने बहेलिया टोळीचा मोरक्या अजित याला आधी अटक केली होती. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया व बावरिया टोळ्यांनी विदर्भातील चंद्रपूरसह मध्य भारतात सुमारे ७० वाघांची शिकार केल्याची माहिती आरोपपत्रात नमूद केल्याची माहिती आहे. वनविभागाच्या विशेष तपास पथकाने पाच राज्यांतील घटनांचा तपास करून शिकारी टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधून काढले. या प्रकरणात पूर्वोत्तर राज्यातील मिझोराम व मेघालय राज्यांतून आरोपींना अटक केली. एकूण २९ आरोपींपैकी १३ जणांना अटक झाली. अटकेतील आरोपींना दंडाधिकारी कोठडीत ठेवण्यात आले. शिकार प्रकरणाचा तपास करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन) विवेक खांडेकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबाचे क्षेत्रसंचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले होते.
व्हाया मिझोराम, मेघालय, हरयाणा...दोन महिन्यांतील तपासातून एक हजार पानांचे आरोपपत्र तयार झाले. या आरोपपत्रात आंतरराष्ट्रीय सिंडीकेटमध्ये २९ आरोपींची नावे आहेत. परंतु ईशान्येकडील तीन आरोपींसह फक्त १३ जणांना अटक करण्यात आली. शिकार प्रकरणाशी संबंधित चंद्रपूरपासून मिझोराम, मेघालय, हरयाणा ते श्रीलंकापर्यंतचे नेटवर्क कसे तयार झाले, यासंदर्भातही धक्कादायक माहिती आरोपत्रात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच राज्यांतील पथकांनी केला तपासमहाराष्ट्राचा वनविभाग, मध्य प्रदेश, आसाम, मिझोराम व मेघालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही तपासासाठी विशेष कामगिरी केली. तीन राज्यांतील अधिकाऱ्यांशी समन्वयाची जबाबदारी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तपास अधिकारी पवनकुमार जोंग व चिंतनकुमार या अधिकाऱ्यांकडे होती.