सिंदेवाही : सर्व शिक्षण अभियान अंतर्गत शासनातर्फे वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी शासनातर्फे पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचे कंत्राट मुंबई येथील कंपनीला दिल्याचे समजते. प्रत्येक तालुक्यात एसटीच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक शाळेला वितरण करण्यात येणार आहे. मात्र मागील एक महिन्यापासून पाठ्यपुस्तके शिक्षण विभागात धूळखात पडून आहे. पण वितरण करण्यात आले नाही. पाठ्यपुस्तकाविना शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हे ध्येय असले तरी काही पालकांची आर्थिक परिस्थिती पुस्तके विकत घेण्याची नाही. पुस्तकाविना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनातर्फे सर्व शिक्षण अभियान अंतर्गत जिल्हा परिषद खासगी अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येत आहेत. दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरणाचे काम गटशिक्षण अधिकाऱ्यामार्फत होत होते. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविल्या जात होती. यावर्षी शासनस्तरावरून झालेल्या निर्णयानुसार पाठ्यपुस्तके वितरणाचे काम मुंबई येथील कंपनीला देण्यात आले. या कंपनीमार्फत शालेय स्तरावर पुस्तके वितरणाचे काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तके शिक्षण विभागात धूळखात पडली असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण निर्माण होत आहे. गटशिक्षण अधिकारी संजय पालवे यांची विचारणा केली असता आम्ही वारंवार कंपनीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून काहीच उत्तर दिले जात नाही. त्यामुळे पुस्तके कधी वाटप होतील, याबद्दल काही सांगता येत नाही, असे सांगितले. तालुक्यात अजूनपर्यंत कुठेही पाठ्यपुस्तकाचे वाटप झाले नाही, हे विशेष.