चंद्रपूर : कोरोनामुक्तीनंतर चंद्रपुरातील म्युकरमायकोसिसग्रस्तांची संख्या ५८ पर्यंत पोहोचली. २६ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली तर एकाचा बळी गेला. एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शन मिळत नसल्याने आरोग्य विभागाने स्वत:च खरेदीचा निर्णय घेऊनही तुटवडा कायम आहे. केंद्र शासनाकडून जिल्ह्याला ८३४ इंजेक्शन मंजूर आहेत. मात्र केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र मृत्यदराचा आलेख घसरला नाही. कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिस हा नावाचा आजार होणाऱ्यांची संख्याही आतापर्यंत ५८ झाली. हे रूग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी चंद्रपुरातील क्राईस्ट व वासाडे या दोन खासगी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिस रूग्णांच्या उपचारासाठी प्रत्येकी २० प्रमाणे ४० बेड्सची व्यवस्था करून दिली. परंतु आजारावरील एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा राज्यभरातच तुटवडा आहे. त्यामुळे आरोग्य सेवा व अभियान संचालकांनी १७ मे २०२१ रोजी तातडीने एक सूचना जारी केली. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही देखील सुरू केली आहे.
नागपूर विभागात चंद्रपूरचा वाटा
केंद्र सरकारकडून राज्याला १६ हजार ५० इंजेक्शन पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर विभागाच्या वाट्याला ४ हजार ५० इंजेक्शन येणार असल्याचे समजते. म्युकरमायकोसिसच्या सक्रिय रूग्णांची संख्या लक्षात घेऊन यातील ८३४ इंजेक्शन चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार आहेत. मात्र, हे इंजेक्शन केंद्राकडून राज्याला केव्हा प्राप्त होणार हे अद्याप निश्चित नाही, अशी माहिती सूत्राने दिली.
प्रत्येक रुग्णाला लागतात सहा इंजेक्शन
खासगी रुग्णालयात दाखल म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी आरोग्य विभागाकडून एम्पोटीरीसीन-बी इंजेक्शन खरेदी करून रूग्णांच्या प्रमाणात वाटप करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने स्वत:कडे घेण्याच्या सूचना आरोग्य सेवा संचालकांनी दिल्या. संपूर्ण डोससाठी लागणारी औषधे एकाच वेळी रुग्णांना न देता प्रत्येकवेळी एक किंवा दोन दिवसाचाच डोस देण्याचे पत्रात नमूद आहे. चंद्रपुरात म्युकरमायकोसिसचे ५८ रुग्ण आहेत. प्रत्येक रुग्णाला सहा इंजेक्शन टोचावे लागतात. मात्र दरदिवशी २० ते २५ इंजेक्शनच प्राप्त होत असल्याने अन्य रुग्णांना ताटकळत राहावे लागत आहे.
असे पोहोचते रुग्णांपर्यंत इंजेक्शन
म्युकरमायकोसिस रुग्ण खासगी रूग्णालयात भरती असेल तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी पुरविलेल्या विहित नमुन्यात संबंधित डॉक्टरांकडून नोडल अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी लागते. नोडल अधिकारी हे औषधी उपलब्धतेची शहानिशा करून जिल्हा आरोग्य सोसायटी कोविड १९ च्या अधिकृत बँक खात्यात इंजेक्शनची रक्कम जमा करण्याची सूचना रूग्णाच्या नातेवाईकांना देतात. रक्कम जमा झाल्याची पोच पावती डीएएम प्रवीण सातभाई यांच्या अधिकृत मोबाईलवर पाठविली जाते. रक्कम जमा केल्याची खात्री पटताच औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकाकडे इंजेक्शन दिले जाते. महात्मा जोतिबा फुले विमा लागू असणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांनाही अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
कोट
म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी काही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. विहित नमुन्यात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर उपलब्धतेनुसार लगेच इंजेक्शन पुरविणे सुरू आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी घाबरू नये. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
-डॉ. प्रतीक बारापात्रे, नोडल अधिकारी, म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन