लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी मृत्यूचा कर्दनकाळ ठरलेल्या येथील वरोरा नाका चौकामध्ये उड्डाणपुलाला समांतर असा दुसरा उड्डाणपूल बांधण्यात आला. याद्वारे अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच चौकामध्ये नागपूरकडून चंद्रपूर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले. त्यासाठी सिमेंटचे मोठमोठे दगड रस्त्याच्या अगदी मधोमध लावण्यात आले आहेत. मात्र, हे दगड विस्कळीत झाले असून, या दगडांमुळे अपघात होत आहेत. दररोज वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधी या रस्त्याने जातात, मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या चौकात प्रशासन पुन्हा एकदा मृत्यू होण्याची वाट तर बघत नाही ना, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील नगर परिषदेचे आता महापालिकेमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. शहरात विकासकामेही झपाट्याने सुरु आहेत. मात्र, या कामामध्ये प्रशासन काही चुकाही करत आहे. अशीच चूक वरोरा नाका चौकामध्येही करण्यात आली आहे. यामुळे अपघात होत असून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जनता काॅलेज चौकातून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर वरोरा नाका परिसरातील रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले असून, यासाठी मोठमोठे सिमेंटचे दगड ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वत्र रस्त्यावर ते विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे रात्री-बेरात्री अपघात होत आहेत. या रस्त्यावरील सिमेंटचे दगड हटवून पक्के दुभाजक बांधून त्यावर रेडियम लावावे, अशी मागणी होत आहे.
बाॅक्स
अधिकारी, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
या रस्त्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शहरातील लोकप्रतिनिधीही जातात. मात्र, त्यातील एकाचेही याकडे लक्ष जाऊ नये, ही शहरवासियांसाठी शोकांतिकाच आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी किमान आता तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.