निलेश झाडेलोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात वन्यजीवांचा हैदोसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान होते. वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. अशात हतबल झालेला बळीराजा कुंपणावर जिवंत विद्युत प्रवाह सोडून अघोरी सुरक्षेचा नादी लागला. या अघोरी सुरक्षेने तालुक्यातीन तीन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे तर दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. ही अघोरी सुरक्षा पुन्हा किती लोकांचा बळी घेणार, असा प्रश्न आता तालुक्यात उपस्थित केला जात आहे.गोंडपिपरी मागासलेल्या तालुक्याचा यादीत समाविष्ट आहे. उद्योग विरहीत असलेल्या या तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याला जंगलाने वेढले आहे. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने शेतपिकांना वन्यजीवांचा हैदोसाचा फटका दरवर्षीच बसतो. शेतपिकांची वन्यजीवांकडून होणारी नासाडी हा गंभीर प्रश्न झाला आहे. शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे.
शेतपिकात वन्यजीवांचा हैदोस हा शेतकºयांपुढे अतिशय गंभीर प्रश्न आहे. नानाविध उपाययोजना करूनही वन्यजीवांकडून नासाडी होतच असते. शेतपिकांच्या होणाºया नुकसानीच्या तुलनेत भरपाईची रक्कम अतिशय तोकडी असते. शेतकºयांनी नेमके काय करावे, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे.- प्रवीण मेश्राम, शेतकरी धाबा
शेताचा कुंपणाला विद्युत प्रवाह सोडण्याचा घातक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात बघायला मिळतो. यात मानव आणि वन्यजीवांचा बळी गेलेला आहे. हे प्रकार बंद व्हावे यासाठी दरवर्षीच महावितरणतर्फे जनजागृती केली जाते.- टी. पी. लेकुरवाळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, धाबा
शेताभोवताल लावलेल्या तार कुंपणाला विद्युत प्रवाह सोडणे हे अत्यंत धोकादायक आहे. याबाबत दरवर्षी वनविभागाकडून जगजागृती केली जाते. हा प्रकार मानवाचा आणि वन्यजीवांचा बळी घेणारा आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनी टाळायला हवा.-एस.जे.बोबडे वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग धाबा.