लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील गंजवॉर्डात भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आहेत. परंतु, किरकोड मार्केटमध्ये तसेच घराजवळ हातठेल्यावर भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्यांच्या भाजीपाल्याच्या दरात दहा ते वीस रुपयांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. चंद्रपुरातील गंजवॉर्ड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रेत्यासह परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे येथील दर हे नियंत्रणात असतात. तसेच गंजवाॅर्डात दररोज बाजार भरत असल्याने अनेकजण सकाळच्या वेळेस येथे गर्दी करीत असतात. गंजवॅार्ड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदे २५ रुपये, टमाटर २५ रुपये किलोने विक्री केले जात आहे. परंतु, हातठेलेवाले कांदे ३० ते ३५ रुपये तर टमाटर ३० ते ४० रुपये दराने विक्री करीत आहेत.
एवढा फरक कसा
गंजवॉर्डात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला स्वस्त मिळतो. याबाबाबत माहिती आहे. परंतु, तेथे पाव, दीडपाव भाजीपाला दिला जात नाही. तसेच घरापासून दूर असल्याने जाणेही परवडत नाही. त्यामुळे घरपोच येणाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो.- प्रतिभा कोडापे, गृहिणी
घरापासून गंजवार्ड दूर येतो. त्यामुळे काही कामानिमित्त त्या परिसरात जाणे झाले तरच तेथून भाजीपाल्याची खरेदी करते. नाहीतर घराकडे येणाऱ्या हातठेल्यावाल्याकडून भाजीपाला खरेदी करतो. गंजवॉर्डपेक्षा घरपोच मिळणारा भाजीपाला महाग असतो.- रंजना खडसे, गृहिणी
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा २५ रुपये, रामनगर चौकात ३५ रुपये
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठोक दराने भाजीपाल्याची विक्री केली जाते. अनेक व्यापारी येथेच किरकोळ विक्रीसाठी बसतात. येथे काद्यांची विक्री व टमाटरची विक्री २५ रुपये किलो तर रामनगर येथे ३५ ते ४० रुपये दराने विक्री केली जात आहे.
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन तो विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र ज्या दराने तो भाजीपाला शहरांमध्ये विकला जातो. त्यातील पैसे शेतकऱ्यांच्या वाट्याला कमी व दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वाट्याला जास्त जातात. यामुळे अनेकदा शेतकरी थेट आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत: घेऊन येऊन विक्री करताना दिसून येतात.
अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!गंजवॉर्डात थेट शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी असतो. याऊलट हातठेल्यावर विक्री विकणारे कृषी उत्पन्न बाजार समिती तेथून भाजीपाला खरेदी करून त्यात स्वत:चा मुनाफा व मेहनत काढून विक्री करीत असल्याने काही प्रमाणात महाग असतात.- संजय गेडाम, विक्रेते
कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच गंजवॉर्डात शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. व्यापारी खरेदी करून विक्री करतात. त्यामुळे थोड्या कमी दरात भाजीपाला मिळत असतो.- राजू रायपुरे,विक्रेते