पिंपळगाव(भो) : अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक घेतले. हे पीक हातीही आले. मात्र शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे धान घरातच पडून आहे. घेतलेली उसनवारी, कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव परिसर हा धान पिकासाठी प्रसिध्द आहे. या परिसरात अल्पभूधारक शेतकरी असून शेतीचा लागत खर्च निघत नसतानाही मजुरीसह दुधाळू पाळीव जनावरे पालन पोषण करून शेती करीत आहेत. डोक्यावर कर्जाचे गाठोडे घेऊन जास्त नाही पण उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर यावर्षी उन्हाळी धानाचे पीक घेतले. उत्पादन होऊनही सरकारी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांनी धान मातीमोल भावाने विकले तर काहींनी आज ना उद्या शासन आधारभूत केंद्रावर धान खरेदी करेल, या आशेवर घरीच धान ठेवले आहे. मात्र आता हंगामात शेतकऱ्यांना पैसे हवे आहेत. कर्ज कसे फेडायचे हाही प्रश्न आहे.