चंद्रपूर : आता ऑनलाइन ई-शिधापत्रिका मिळणार असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा केली जात आहे. ही शिधापत्रिका लाभार्थ्यांना पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्जसुद्धा भरावा लागणार आहे. दरम्यान, नागरिकांना तथा सेवा केंद्रातील ऑपरेटरला ई-शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास काय करायचे, यासंदर्भात चंद्रपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने जनजागृती सुरू केली आहे. या शिबिरासाठी तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी राजू धांडे, पुरवठा निरीक्षक खुशबू चौधरी यांची उपस्थिती होती.
नागरिकांना आता नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. यानंतरच शिधापत्रिका उपलब्ध होणार आहे. शिधापत्रिका वितरणाच्या कामकाजात सुलभता येण्यासाठी तथा नागरिकांना कमी कालावधीत शिधापित्रका मिळण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. ई-शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये नागरिकांना ही शिधापत्रिका डाउनलोड करता येणार आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, नाव दुरुस्ती करणे, पत्ता बदल करणे, नाव वाढविणे किंवा कमी करणे इत्यादी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी तहसीलदार पवार यांनी सांगितले. दरम्यान, नायब तहसीलदार राजू धांडे, पुरवठा निरीक्षक खुशबू चौधरी यांनीही यावेळी ई-कार्डसंदर्भात माहिती दिली. या जनजागृती शिबिराला मोठ्या संख्येने सेतू केंद्र संचालकांची उपस्थिती होती.
अशी करता येणार ई-शिधापत्रिका डाउनलोड?
ई-शिधापत्रिकेसाठी https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.