चंद्रपूर : केसामध्ये कोंडा होणे ही सामान्य समस्या झाली आहे. महिलांसह पुरुषांनाही केसातील कोंड्यामुळे त्रास होतो. त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊन केसांत कोंडा होतो. अशा परिस्थितीत डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी विविध उपाय केले जातात. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर अनेक दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. खांद्यावर तसेच पाठीवर बारीक पुरळ तसेच कानामध्ये वारंवार खाज येण्यास सुरुवात होते. त्यामुळे केसात कोंडा झाला असेल तर वेळीच उपचार घ्यावा, असा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. नम्रता बारापात्रे यांनी दिला आहे.
केसात कोंडा कशामुळे होतो?डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहत असेल तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे केसांत कोंडा होतो. अनेकवेळा तरुणी वेगवेगळे शॅम्पू, तेल किंवा साबणांचा वापर करतात; मात्र सतत ब्रँड बदलत राहिल्यामुळे त्याची अॅलर्जी होऊ शकते. त्याप्रमाणेच प्रदूषणातील काही घटकांमुळेही अॅलर्जी होऊ शकते. परिणामी, केसात कोंडा होऊ शकतो.
कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपाय काय?नारळ तेल: खोबरेल तेलदेखील कोंड्यासाठी उपयुक्त आहे. एका भांड्यात खोबरेलतेल घेऊन थोडे गरम करा. त्यानंतर डोक्याला तेलाने चांगले मसाज करा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा. यामुळे तुमच्या टाळूचा कोंडा कमी होईल.
लिंबू : लिंबाच्या रसामध्ये अँटिमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेंट्री दोन्ही गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म केसांना बुरशीपासून मुक्त करू शकतात. यासह ते टाळूला खोल पोषणदेखील देतात. कापसाच्या मदतीने दर आठवड्याला एक किंवा दोन लिंबाचा रस पातळ करुन टाळूला लावा.
दही : एका भांड्यात दही घेऊन त्याने डोके चांगले धुवा. कमीत कमी अर्धा तास केसांमध्ये दही लावल्याने केसांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या कमी होतात.
सीताफळाच्या बिया : सीताफळ हे अत्यंत गुणकारी फळ असून, या फळाप्रमाणेच त्याच्या बियाही गुणकारी आहेत. सीताफळाच्या बियांचे चूर्ण करून ही पेस्ट अर्धा तास केसांच्या मुळाशी लावावी. त्यानंतर ती धुवून टाकावी.
"ऐका आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला डोक्यात कोंडा होणे हा अगदी सर्वसामान्य त्वचारोग आहे. जर केस नियमितपणे धुतले गेले नाहीत तर तेल आणि त्वचेच्या पेशी टाळूमध्ये वाढू लागतात. या पेशीनंतर डोक्यातील कोंडा म्हणून बाहेर पडू लागतात. निरोगी केस मिळविण्यासाठी नियमितपणे केस स्वच्छ करावे. हे केसांवर कंडिशनर सारखेच कार्य करते. वारंवार शाम्पू वा तेल बदलवू नये, निंब तेल व करंज तेल केसांच्या मुळांशी लावल्यास कोंडा नाहीसा होतो. आवळा व गुळवेलचे रसायन सेवन केल्यास फायदा होतो. अधिक समस्या जाणवल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा." - डॉ. नम्रता बारापात्रे, आयुर्वेद तज्ज्ञ, चंद्रपूर