लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ढगांनी व्यापला की काय, असे वाटू लागले आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खरीपातील धान व रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. रबी पिकांवर रोगराईचे आक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येऊन नुकसान होईल, या दृष्टीने काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यातील धानाचे ढीग शेतात झाकून ठेवावे लागले. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रबी पिके फुलोऱ्यावर आले असताना अचानक राजुरा तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली होती. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे.नववर्षाच्या प्रारंभीच संकटयावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून शेतात राबणे सुरू केले. खरीप पिकांची लागवड केली. मात्र निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन मदतीचा हात पुढे करीत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचे दिवस वाईट आले आहे. नवीन वर्ष सुरू होताच आता वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने पिकांची उत्पादकता घटणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.चिमुरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरीचिमूर परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर, शंकरपूर, भिसी, मासळ, खडसंगी, आमडी, बोथली परिसरात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय नागरिकांत थंडीने हुडहुडी भरली आहे. या वातावरणामुळे लहान मुलाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे.ग्रामीण भागात दिवसाच शेकोट्यागुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यानेही नागरिकांना दिवसभर दर्शन दिले नाही. अशातच जिल्हाभर रिमझिम पावसानेही हजेरी लावली. ग्रामीण भागात थंडीचा जोर मोठा होता. अंगात हुडहुडी भरत असल्यामुळे नागरिक जिथे-तिथे शेकोटया पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून येत होते.
ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:08 AM
गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देजिल्हाभर रिमझिम पाऊस : खरिपातील धान, रबी पिकांना फटका