लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील एका लाभार्थी महिलेने यावेळी केला. हा पोषण आहार आम्ही आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालतो, असेही काही लाभार्थ्यांनी लोकमतला सांगितले.
१ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहातच हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २,५६५ अंगणवाड्या तर मिनी अंगणवाडी ११९ अशा जिल्ह्यात २ हजार ८८४ अंगणवाड्या आहेत. लहान मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ लागावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून या पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनतर्फे केला जातो. दर दोन महिन्यांनी हा आहार दिला जातो. यात तांदूळ (१९०० ग्रॅम), गहू (१९०० ग्रॅम), मिरची पावडर (२०० ग्रॅम), हळद (२०० ग्रॅम), मूगडाळ (१००० ग्रॅम), मीठ (४०० ग्रॅम), साखर (१०००ग्रॅम) दिले जाते. या वस्तूंबाबत काही लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष शहानिशा केली असता या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली. सर्वच अंगणवाडीतील हा प्रकार असल्याचे पुढे आले.
अंगणवाडी सेविकांवर दबाब
पुरवठादाराकडून पोषण आहाराचा जो पुरवठा करण्यात येतो तो पाकिट बंद असतो. तो तसाच लाभार्थ्यांना वाटप करावा लागतो. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी काहीवेळा आल्या. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले असता आमच्यावर दबाव आला.
- एक अंगणवाडी सेविका.
गहू निकृष्ट, चणा पाकिटत किडे
बिबी गावातील एका लाभार्थ्याकडे असलेली पोषण आहाराची पाकिटे फोडून बघितली असता गहू अतिशय निकृष्ट तर चणा पाकिटात किडे आढळून आले. तिखट, हळद व मिठात भेसळ असल्याचे दिसून आले. इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तिखटामध्ये बारीक माती दिसून आली.
लाभार्थी म्हणतात...
पोषण आहारामध्ये चणा, मूगडाळ, गहू, हळद, मीठ, तांदूळ येत आहे. तिखट, चणा व मूगडाळ याचा दर्जा निकृष्ट आहे. या वस्तू खाण्यायोग्य सुद्धा नाही. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर हाेतो. तिखट तर फेकूनच देते. तेल मिळत होते. ते बंद झाले.
- सुप्रिया सुळे, लाभार्थी.
पोषण आहार वाटप केला जातो. त्याचा टेस्ट रिपोर्ट असतो. काही अंगणवाडीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात. पावसामुळे एखादठिकाणी होऊ शकते. ते आम्ही बदलून देतो. पोषण आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत अद्याप आलेल्या नाही. तक्रारी असल्यास आम्ही तो बदलून देतो.
- प्रकाश भांडेकर, बालविकास अधिकारी (शहर), चंद्रपूर.