वन्यजीवप्रेमींकडून दखल : म्हणे वृक्षामुळे परिसरात होते घाणवेदांत मेहरकुळे - गोंडपिपरीशहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- अहेरी मार्गस्थित एका निवासस्थानासमोर एक चिंचेचे वृक्ष मागील अनेक वर्षापासून लोकांना सावली देत आहे. निवासस्थानाचे मालक तिथे राहत नसल्याने त्या विशाल आकाराच्या वृक्षावर अनेक दिवसांपासून बगळा जातीच्या पक्ष्यांनी तळ ठोकून घरटे बांधले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या या वृक्षाची काल एकाएकी तोड करण्यात आल्याने शेकडो बगळ्यांचा निवारा हिरावला.वृक्षालगत असलेल्या निवासस्थानात गोंडपिपरी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार रहावयास येणार असल्याने स्वच्छतेच्या कारणावरुन त्यांनी वृक्ष तोडीस पुढाकार घेतल्याची माहिती आहे.शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-अहेरी मार्गस्थित नवीन बसस्थानक परिसरात नागापूरे कंत्राटदार यांच्या मालकीचे मकान आहे. कंत्राटदार नागापुरे यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबिय सध्या चंद्रपूर येथे राहत आहेत. आजवर त्यांचे गोंडपिपरी निवासस्थान रिकामेच होते. मात्र गोंडपिपरी येथे चिमूरहून नव्यानेच रुजू झालेले नायब तहसीलदार बन्सोडे यांनी नागापुरे यांचे घर भाड्याने रहावयास घेतले. नागापुरे यांच्या निवासस्थानासमोरील चिंचेचे वृक्ष व त्यावर बसणाऱ्या पक्ष्यांच्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याच्या कारणावरुन काल सायंकाळच्या सुमारास सदर वृक्षाची तोड करण्यात आली. वृक्षतोडीमुळे त्या वृक्षावर वर्षानुवर्षापासून वास्तव्य करणाऱ्या बगळा जातींच्या शेकडो पक्ष्यांची घरटी नष्ट झाली. वयस्क बगळ्यांनी उडून दुसरीकडे निवाऱ्याचा शोध घेतला. मात्र झाडावरील घरट्यात अडकून असलेल्या काही नवजात पिल्लांचा मात्र उडता न आल्याने हकनाक जीव गेला. हा अन्यायकारक प्रकार काही वन्यजीवप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी सदर घटनेची कल्पना वनविभागाला दिली व वनकर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळविली असता त्या वृक्षतोडीसाठी नायब तहसीलदार बन्सोडे यांनी पुढाकार घेऊन कामगारांच्या हातून वृक्षतोड केल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या व शेकडो पक्ष्यांचे वास्तव्य असणाऱ्या वृक्षाची तोड करण्याची परवानगी दिली कोणी, असा सवाल वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. स्वगृहासमोरील परिसर स्वच्छतेसाठी इतरांचा निवास हिरावणे अन्यायकारकच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यात गंभीर बाब अशी की वृक्षतोडीनंतर काहींनी मासांहाराकरिता बगळे नेल्याची माहिती आहे. याची माहिती वनविभागाला मिळाली असता त्यांनी तात्काळ काही बगळ्यांना जीवनदान देण्यासाठी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
शेकडो बगळ्यांचा हिरावला निवारा !
By admin | Published: August 24, 2014 11:22 PM