वरोरा : मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची उगवण क्षमता घरीच प्रयोग करून तपासत आहेत. ७० टक्केपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले शेकडो क्विंटल सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी दुकानदारांना परत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी केंद्र संचालकही धास्तावले आहेत.गतवर्षीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे पीक हाती येण्यास बराच कालावधी लागला. सोयाबीन शेतात उभे असताना अकाली पाऊस झाला. त्यामुळे शेंगातील दाण्यांना अंकूर फुटले. या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून शेतात ठेवले होते. तेही पाण्यात सापडल्याने त्याची प्रतवारी घटली. चालु वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. यावर्षी सोयाबीन बियाणे बाजारात आले असले तरी, त्याच्या उगवण क्षमतेमुळे सारेच संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती करीत सोयाबीनची उगवण क्षमता घरीच तपासण्याचे प्रयोग शेतकऱ्यांना दाखविले. शेतकरी, सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून घेवून जात आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्याची उगवण क्षमता घरी तपासून बघत आहे. उगवण क्षमता ७० पेक्षा कमी आहे, असे बियाणे कृषी केंद्राकडे परत देत आहे. आजपावेतो शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांनी परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांअभावी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले, ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे बिल दाखविल्यास परत कृषी केंद्राने घ्यावे, असे असताना काही कृषी केंद्र संचालक घेण्यास नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे परत न घेणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
By admin | Published: June 19, 2014 11:45 PM