आॅनलाईन लोकमतजिवती : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गोची होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त आहेत. येथे एक ते चारपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेत होते. मात्र मागील दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिवती तालुक्यातील अनेक शाळेमध्ये तेलगू शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह मराठी शाळेकडे वळताना दिसून येत आहे. मात्र वाहतुकीच्या साधणांची अडचण असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.विद्यार्थ्यांसाठी शासनाने मानव विकास अंतर्गत बस सुरु केल्या. मात्र जिवती तालुक्याच्या सीमेवर १४ वादग्रस्त गावात बसेस जात नसल्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पायदळ शाळेत जावे लागत आहे. तर पुढील २५ किमीचे अंतर खासगी आॅटोतून जिवघेणा प्रवास करीत करावा लागत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करायची पण ग्रामीण भागात अजूनही बहुतेक योजना पोहचल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीनामध्ये स्थगिती व गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:49 PM
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत.
ठळक मुद्देजिवती सीमेवरील वास्तव : शिक्षणासाठी पायी प्रवास