चंद्रपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रवींद्र टाेंगे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला गुरुवारी ११ दिवस झाले. त्यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावू लागली. मात्र, शासनाने आंदोलनाची अद्याप दखल न घेतल्याने ओबीसी युवकांनी गुरुवारी भीक मांगो आंदोलन करून निषेध नोंदविला. भिकेतून मिळालेली रक्कम सरकार सरकारकडे मनीऑर्डरद्वारे पाठविण्यात आले.
ओबीसी समाजाच्या मागणीनुसार सरकारने राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची घोषणा अंमलात आणावी, जातनिहाय जनगणना व स्वाधार योजना लागू करावी, आदींसह विविध मागण्या घेऊन रवींद्र टाेंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृह, आधार योजना, विदेश शिष्यवृत्तीसाठी सरकारने निधी दिला नाही. सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतिगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही, असा आरोप आहे. उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा गंभीर परिणाम उमटतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला.
मुंडन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी
ओबीसींच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून गुरुवारी ओबीसी कार्यकर्त्यांनी रवींद्र टोंगे यांच्या उपोषणस्थळी मुंडन केले. आंदोलन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्र्यांचे मुखवटे लावल्याने नागरिकांत चर्चेचा विषय झाला. मुंडन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी झाली. महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, सुभाष गौर, राजेश बेले, देवा पाचभाई, माजी नगरसेविका सुनीता लोढिया, ॲड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.
आज ओबीसी संघटनांची बैठक
शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी आज (दि. २२) रोजी ओबीसीमधील सर्व जातीय संघटनांची चंद्रपूर तुकूम येथील मातोश्री सभागृहात दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठक यशस्वी व्हावी यासाठी जिल्ह्यातील ओबीसी संघटना कामाला लागल्या आहेत.