शंकरपूर : चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या खापरी डोमा परिसरात एका शिकारी टोळीने नीलगाईची शिकार करून मांस चार गावांत विकले. वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून शिकाऱ्यांसह मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या टोळीजवळ दोन बंदुका, बारुद, फासे आढळून आल्याने या टोळीने वाघ, बिबट्यांचीही शिकार केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.शंकरपूर वनक्षेत्रात मागील अनेक दिवसापासून वन्यप्राण्याची शिकार करणारी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती वनविभाग तसेच पर्यावरणवादी मंडळाला मिळाली होती. मात्र आरोपी वनविभागाला गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. दरम्यान गुरुवारी रात्री कवडसी येथील आंबाई निंबाई क्षेत्रात नीलगाईची शिकार करण्यात आली. याची माहिती वनविभाग व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे तरुण पर्यावरणवादी मंडळास मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि मंडळाचे सदस्य सक्रीय झाले. दरम्यान खापरी येथे किसन श्रीरामे याला नीलगाईच्या मासांसह अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याचे सहकारी आरोपी दिवाकर वाघमारे (३५) रा. वायगाव जि. भंडारा याच्या घरी मांस व बंदुक जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत कवडू नन्नावरे रा. कवडसी (देश.), सोमेश्वर शेंडे रा. हिरापूर या चारही आरोपींना अटक करण्यात आली. या सर्र्व आरोपींनी गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास अंबाई-निंबाई या जंगलात बंदुकीच्या साहाय्याने नीलगाईची शिकार केली. त्यानंतर शिकारीचे चार तुकडे करुन वायगाव, हिरापूर, कवडसी व खापरी येथे नेऊन तिथे हिस्से पाडून विकण्यात आले. विशेष म्हणजे, ज्यांनी मांस विकत घेतले त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र ते आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले. या टोळीमुळे अन्य घटनाही उघडकीस येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही कारवाई सहायक उपवनसंरक्षक एस.बी. पंधरे, हुमने, कीर्तने, नरड, तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्यांनी केली. (वार्ताहर)
खापरी येथे शिकारी टोळी गजाआड
By admin | Published: November 22, 2014 12:27 AM