विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) : जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये लग्नाचे मुहूर्त असतात. मार्च आणि जूनपर्यंत लग्नसराई जोरात असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून लग्नसराईला कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. अनेक विवाह सोहळे अगदी चार ते पाच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने पार पडले. मात्र, यावेळेस संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धास्तीने ग्रामीण भागामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच लग्न सोहळे उरकण्याची घाई वर व वधू पक्षांमध्ये दिसत आहे.
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्यामुळे ग्रामीण भागात सध्या ‘ना लग्न पत्रिका, ना मंगल कार्यालय, ना बँडबाजा’ अशा परिस्थितीमध्ये लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लग्नसराईत विवाह मुहूर्ताची मोठी रेलचेल दिसून येत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच लग्न उरकण्यासाठी व अपेक्षित स्थळे मिळविण्यासाठी वधू व वर पक्षाकडील मंडळींची मोठी धावपळ दिसू लागली आहे. कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे गेला नसल्याने कमी खर्चात व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य आटोपले जात आहे. लग्नाच्या प्रत्येक गोष्टीवर कोरोनाने मर्यादा आणल्या आहेत. पाहुण्यांची उपस्थित कमी झाल्याने कपडे खरेदी, जेवण व्यवस्था, बांगड्या, मंगल कार्यालय, वाजंत्री आदी व्यवसायांवर संक्रांत आली आहे. लग्न सोहळ्यामध्ये कोरोना संसर्गाचे नियम पाळणे बंधनकारक असल्याने सध्या लग्न साध्या पद्धतीने होत आहेत. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर लग्न झाल्याचे लोकांना कळते.
बॉक्स
वधू शोधताना दमछाक
स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींच्या जन्मदरात घट झाल्याने वर पक्षाची वधू शोधताना चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे एखादे स्थळ चांगले दिसले की, लवकर लग्न उरकण्याची लगबग सुरू होते. अनेक जण दिवाळीनंतरच लग्नकार्य आटोपण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.