चंद्रपूर : संशय कोणत्या थराला घेऊन जाईल, याचा विचार करवत नाही. मग, नातेही क्षुल्लक वाटायला लागते. याच संशयातून एका ७४ वर्षीय इसमाने अंगणातच सरण रचून पत्नीला जिवंत जाळले.
समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी दि. ४ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी मूल तालुक्यातील सुशी गावात घडली. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (६५) रा. सुशी असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गंगाराम सोमाजी शेंडे (७४) असे निर्दयी पतीचे नाव आहे.
मुक्ताबाई आणि गंगाराम शेंडे हे वृद्ध दाम्पत्य अख्खे आयुष्य एकमेकांशिवाय जगले नाही. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी त्या दाम्पत्यांमध्ये संशयाने जागा केली. गंगाराम याही वयात पत्नीवर संशय घेऊ लागला. अशातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नेहमीच क्षुल्लक कारण वादाचे कारण होत होते. गंगारामच्या मनात संशयाने पक्के घर केले होते.
मंगळवारी सकाळी मुक्ताबाई अन्न शिजविण्यासाठी लागणारे सरपण आणण्यासाठी लगतच्या जंगलात गेली. ही बाब गंगारामला खटकली. ती सरपण घेऊन दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घरी परतताच गंगारामने तिच्याशी वाद घालून भांडण केले. भांडणातून त्याने तिला बेदम मारहाण केली. डोक्यात सैतान संचारल्यागत वागत असलेल्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर बळजबरीने मुक्ताबाईला टाकून तिच्या अंगावर डिझेल टाकले आणि आग लावली.
या आगीने मुक्ताबाई होरपळत होती. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी त्या दिशेने धावून आले. ती मदतीची याचना करीत होती. अखेर नागरिक तिच्या मदतीला धावून आले. लगेच उपचारार्थ चंद्रपूरला सामान्य रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास वाटेतच मुक्ताबाईची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी मूल पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून गंगाराम शेडे याला अटक केली आहे. पुढील तपास मूलचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे.
गावकरीही होते अंतर ठेवून
गंगाराम शेंडे हा स्वभावाने अतिशय तापट होता. गावातील नागरिकांशीही त्याचे पटत नव्हते. अनेकजण त्याच्याशी अंतर ठेवूनच वागत होते. या दोघांमध्ये वाद व्हायचा. अखेर गंगारामने तापट स्वभावातून पत्नीलाच जिवंत जाळल्याची घटना घडली असल्याची चर्चा गावात आहे.