चंद्रपूर : दारू पिऊन पतीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर लाटण्याने वार करून हत्या केली. याबाबत कुणालाही न सांगता पत्नीने अख्खी रात्रच मृतदेहाजवळ काढली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर येथील इंडस्ट्रियल एरिया परिसरात गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी मुलगी घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिने याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना दिली.
अलकराम मनीराम राऊत (४५) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी सुरजाबाई राऊत हिला अटक केली आहे.
चंद्रपुरातील बंगाली कॅम्पलगतच्या इंडस्ट्रियल एरिया परिसरात अलकराम मनीराम राऊत आपल्या पत्नीसह भाड्याच्या घरात वास्तव्य करीत होते. ते मूळचे छतीसगड राज्यातील रहिवासी असून, चंद्रपुरात रोजगाराच्या शोधात आले होते. मागील काही वर्षांपासून अलकराम हा मिस्त्रीचे काम करीत होता. अलकरामला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन यायचा. यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. गुरुवारी त्यांची मुलगी चंद्रपुरात राहणाऱ्या आपल्या आजीकडे गेली होती. दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की दोघेही हातापायीवर आले. सुरजाबाई हिने पती अलकरामला धक्का दिला. त्यानंतर पोळ्या करायच्या लाटण्याने त्याच्या डोक्यावर मारहाण केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र, तिने कुणालाही याबाबतची माहिती दिली नाही. संपूर्ण रात्र तिने मृतदेहाजवळच बसून काढली.
दुसऱ्या दिवशी आजीकडे गेलेली मुलगी घरी परत आली. यावेळीही तिने आपल्या मुलीला काहीही सांगितले नाही. दरम्यान तिला हा प्रकार लक्षात येताच तिने रामनगर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांच्यासह पोलिसांचा चमू घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी पत्नीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.