चंद्रपूर: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. मात्र बिंग फुटू नये म्हणून घरी चोरटा शिरला अन् पतीची हत्या करुन दागिणे घेऊन पसार झाल्याचा बनाव केला. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मृतकाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला २४ तासात बेड्या ठोकल्या. स्वप्निल ताराचंद गावंडे (३४) रा. घुटकाळा तलाव हनुमान चौक चंद्रपूर असे अटक झालेल्या प्रियकराचे नाव आहे. मनोज रमेश रासेकर (४५) रा. विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड, चंद्रपूर. असे मृतकाचे नाव आहे.
गुरुवारी मध्यरात्री घरात चोरटे शिरले. त्या चोरट्याने पतीची उशीने तोंड दाबून हत्या केली. सोन्याचे दागिणे, सासूच्या गळ्यातील गोप व पैसे घेऊन पसार झाल्याची तक्रार मनोजच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनमध्ये केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तपासाचा छळा लावण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास केला असता मृतकाच्या पत्नीचे तिच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली. परंतु या प्रेमसंबंधात मृतक आडवा येत असल्याने त्याचा काटा काढण्याचा दोघांनी ठरवले, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
असा रचला होता कट
मनोज रासेकर हा १५ दिवसांपूर्वी आजारी पडला होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. ही संधी साधून त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पती मनोजला संपवून तो आजारपणाने मरण पावला असा देखावा निर्माण करण्याचा कट रचला. गुरुवारी तिने प्रियकर शिक्षकाला बोलावून आजारी मनोजचे तोंड उशीने दाबून त्याची हत्या केली. यावेळी झालेल्या झटापटीत मनोजची वयोवृध्द आई जागी झाली. तिलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देऊन मनोजच्या पत्नीने चोर आल्याचा देखावा निर्माण केला. घरातील आलमारी उघडून त्यातील कपडे अस्ताव्यस्त फेकले. सासुला गळयातील सोन्याची पोत काढून मारेकरी शिक्षकाला देण्यास भाग पाडले. मारेकरी पळून गेल्यानंतर ही घटना मनोजच्या नातेवाईकांना अवगत केली. त्यानंतर शहर पोलिसांत खोटी तक्रार केली होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोहवा संजय अतकुलवार, संतोष एलकुलरवार, नितीन रायपुरे, रवी पंधरे, सायबरचे मुजावर अली, अमोल सावे, वैभव पत्तीवार, उमेश रोडे आदींनी केली.