साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृत्युदरही वाढला. अनेकांना कुटुंबातील जीव गमवावे लागले. घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आई-वडील दोघांनाही कोरोनाने हिरावलेले पाच, तर आई-वडील यापैकी एकाला गमावलेल्या ५७ बालकांची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये ३३ मुलांच्या तर ३१ मुलींच्या डोक्यावरील छत्र हरविले आहे. घरातील एकमेव आधार असलेल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांची संख्या अधिक आहे. आता या बालकांना मेरे पास सिर्फ माॅ है, अशी म्हणण्याची वेळ आली असून जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजवला. जो तो रुग्णालयात धाव घेत असल्याचे चित्र होते. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरचा सर्वत्र शोध घेतांना रुग्णांच्या कुटुंबीयांची फजिती झाली. २ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ४७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोना लाट ओसरत असली तर धोका मात्र कायम आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये ६४ बालकांच्या डोक्यावरील छत्र कोरोनाने हिरावले आहे. यातील बहुतांश बालकांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या बालकांची जबाबदारी आणि पुनर्वसन करण्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे हात कसे पसरविणार, असा प्रश्न आता या कुटुंबीयांना पडला आहे. घरचा कर्ता पुरुष गमविल्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी या बालकांच्या आईंना मोठी कसरत करावी लागत असून या बालकांच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी या माऊलींवर येऊन पडली आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण- ८३२२८
बरे झालेले रुग्ण-७९८१३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-१९४५
एकूण मृत्यू-१४७०
बाॅक्स
पाच जणांचे आई-वडिलांचे छत्र हरवले
जिल्ह्यात पाच बालकांचे आई-वडील दोघेही कोरोनाने हिरावले आहेत. यामध्ये सावली १, चंद्रपूर २, चिमूर २ येथील बालकांचा समावेश आहे. तर ५७ बालकांत्या आई-वडिलांपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या बालकांना शासनातर्फे मदत केली जाणार आहे. मात्र त्यांना आई-वडिलांच्या प्रेमाला मुकावे लागणार आहे.
बाॅक्स
आई-वडील दोघेही कोरोनाने हिरावलेली बालके
सावली -१
चंद्रपूर -२
चिमूर -२
एकूण -५
दोघांपैकी एक गमावलेली बालके
चंद्रपूर -३५
भद्रावती -१
पोंभूर्णा -४
गोंडपिपरी -२
सिंदेवाही -२
राजुरा -२
चिमूर -३
सावली -१
नागभीड -४
बल्लारपूर -९
मूल -१
बाॅक्स
जगण्याचा प्रश्न
बल्लारपूर तालुक्यातील एका आठ वर्षीय बालिकेच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील विमा एजंट म्हणून काम करायचे तर आई गृहिणी आहे. घरचा कर्ता पुरुष गमविल्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. काय करावे, तिच्या आईला आता कळेनासे झाले आहे.
बाॅक्स २
आईवडील दोघांचाही मृत्यू
सावली तालुक्यातील एका सात वर्षीय बालकाचे आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाला. उच्चशिक्षित असलेले आणि घरची परिस्थीती ठीक असली तरी दोघांनीही जगाचा निरोप घेतल्यामुळे या मुलावर मोठा आघात झाला.
बाॅक्स
१०९८ येथे करा संपर्क
कोरोनामुळे आई-वडील गमविलेल्या बालकांचा प्रशासनातर्फे शोध घेतला जात आहे. आपल्या परिसरात अशी बालके आढळल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला किंवा १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, यामुळे या बालकांना त्यांचा हक्क मिळवून देणे सोपे होईल.