राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब)च्या विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांकरिता बर्ड फिडर, घरटे व पाण्याचे पॉट लावले.
नेहमी दिसणाऱ्या गोष्टीचे खरे महत्त्व जाणवत नाही. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण. वाढत्या प्रदूषणामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचे प्रतीक आहे. जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चीवचीव चिमणी गेली कुठे, असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच किंवा म्युझियममध्येच दिसणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, २०१० सालापासून हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे, अशी माहिती राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले व विद्यार्थिनी प्रमुख श्रुती रायपुरे यांनी दिली. या वेळी आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, सहायक शिक्षक रुपेश चिडे, संतोष वडस्कर आदींसह राष्ट्रीय हरित सेना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.