संतोष कुंडकर चंद्रपूरशासनाने पुरग्रस्तांसाठी उभारलेल्या वस्तीवर खुद्द पवार नामक कंत्राटदाराचाच डोळा असतो. त्या वसाहतीतील घरे संबंधित लाभार्थींना मिळण्याऐवजी आपल्या नातलगांना मिळावी, यासाठी त्याचा प्रयत्न असतो. हाच कंत्राटदार शहरातील एका महाविद्यालयाचा अध्यक्षदेखील असतो. मात्र त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा आणि सामाजिक जाणिवा असलेला अर्जुन कंत्राटदाराचा हा कट उधळून लावतो. वसाहतीतील घरांची कुलूपे तोडून ती घरे गरजू दलित लाभार्थ्यांना अर्जुन मिळवून देतो. मात्र पवारांच्याच महाविद्यालयात कार्यरत प्रा.सतीश यांना अर्जुनचे हे कृत्य पटत नाही. कायदा हातात घेण्याला त्यांचा विरोध असतो. बाबासाहेब आंबेडकरांसोबत प्रत्यक्ष कार्य करणारे प्रा.सतीश यांचे काका मात्र अर्जुनची बाजू घेऊन त्याच्या आंदोलनात सहभागी होतात. या दरम्यान, कंत्राटदार पवार यांच्याशी जवळीक असलेल्या दासरावची मुलगी अर्जुनच्या प्रेमात पडते. अर्जुनही मनातून तिच्यावर प्रेम करीत असला तरी तो ते व्यक्त करीत नाही. उलट तिच्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो. प्रा.सतिश यांची पत्नी हेमा ही ब्राम्हण कुटुंबातील असते. तिचा आणि काकांचा वैचारिक संघर्ष सुरू असतो. काका नेहमी तिला जातीच्या मुद्यावरून टोमणे हाणत असतात. यादरम्यान, अर्जुनला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर असतात. मात्र प्रा.सतिशची पत्नी हेमा त्याला मदत करते. यातून मोठा संघर्ष निर्माण होतो. अखेर अर्जुनचा या संघर्षात विजय होतो. असे मध्यवर्ती कथानक असलेले ‘वाटा पळवाटा’ हे नाटक यवतमाळच्या कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेने चंद्रपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरिय नाट्य स्पर्धेत सादर केले.दत्ता भगत लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन अविश वत्सल बन्सोड यांनी केले. नेपथ्य गजानन कासार, दिलीप भगत यांचे होते. प्रकाश योजना अशोक कार्लेकर यांची होती. संगीत प्रबोध मडावी, चेतन बालपांडे यांची तर वेशभूषा मीरा मडावी, प्रगती कोलारकर यांची होती. या नाटकात दशरथ मडावी (प्रा.सतीश), काका (अविश बन्सोड), चारूलता पावशेकर (हेमा), संगीतराव बारी (दासराव), राज पावशेकर (ईन्स्पेक्टर), प्रशंसा पाटणकर, (सोनल), रोहीत राठोड, (अरविंद देशमुख), तर चेतन दुरतकर, नंदकिशोर तिरमारे, सचिन भगत यांनी विद्यार्थ्यांची भूमिका केली. नाटकाचे कथानक चांगले असले तरी नाटक संथगतीने पुढे गेले. त्यामुळे अधून-मधून ते रटाळ वाटत होते. काही प्रसंगात मात्र कलावंतांनी जीव ओतला. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दादही दिली. यातील दशरथ मडावी, चारू पावशेकर, आणि अविश बन्सोड यांच्या दमदार अभिनयानेच या नाटकाने तग धरली. संवाद विसरण्याचा प्रकारही अनेकदा खटकून गेला. नेपथ्य मात्र उत्तम होते. यातील अर्जुनची भूमिका करणाऱ्या विवेक कांबळे या कलावंताला आवाजाचा तोल सांभाळता आला नाही. ‘अॅग्रेसीव’ स्वभाव दाखविण्याच्या नादात त्याचा अभिनय नाटकी होत गेला. चारू पावशेकर यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. मात्र त्यांचे संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहचत नव्हते. दिग्दर्शक अविश बन्सोड यांनी केलेली काकाची भूमिका मात्र सुंदर वठविली.
तीन पिढ्यांचा वैचारिक संघर्ष: वाटा पळवाटा
By admin | Published: November 29, 2014 1:06 AM