राजेश मडावी
चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी काठावरील देवटोक येथे नवीन मंदिराच्या बांधकामदरम्यान २५ मे २०२१ रोजी पुरातन शिवपिंड आढळली. येथे पुन्हा काही वास्तू अथवा वस्तू आढळण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा. शास्त्रशुद्ध उत्खनन झाल्यास जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास उजेडात येऊ शकतो, असा दावा भारतीय संस्कृती निधीचे संयोजक व अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना केला.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या शिवलिंगाच्या पार्श्वभूमीवर देवटोक येथील शिवलिंगाची प्राचीनता आणि वेगळेपण कशात आहे, असे विचारल्यानंतर अशोकसिंह ठाकूर म्हणाले, देवटोकमध्ये आढळलेल्या शिवलिंगाचे देखणेपण नजरेत भरते. विदर्भात परमार राजवंशातील राजे जगदेव यांचे राज्य होते. या राजाचा कालखंड इ. स. १०९५ ते ११३४ पर्यंतचा आहे. जगदेवाच्या कार्यकाळात मार्कंडा देव येथील शिव मंदिरांचा समूह, ठाणेगाव येथील शिवमंदिर, भटाळा, जुगाद, सोंडो येथील मंदिर समूह, घंटा चौकी आणि गडचांदूर येथील मंदिरांचा समूह तसेच अन्य मंदिरेही उभारण्यात आली. जगदेव परमार हे शिवभक्त होते. त्यामुळे देवटोकातील शिवलिंगाच्या निर्मितीच्या ऐतिहासिकतेचा अनुबंध लक्षात येतो, याकडेही अभ्यासक ठाकूर यांनी लक्ष वेधले.
देवटोकातील शिवलिंग ११ ते १२ व्या शतकातील
देवटोक हे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. या नदी पलिकडील तीरावर मार्कंडा हे हेमांडपंथी देवस्थान प्रसिद्ध आहे. देवटोक म्हणजे मार्कण्डेय ऋषी यांचे वडील श्री मुरकेन्डेश्वर ऋषी यांचे स्थान असल्याची आख्यायिका असल्याचे विचारताच अशोकसिंह ठाकूर म्हणाले, देवटोक येथील शिवपिंडाचा संशोधकांनी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे देवटोक आणि मार्कडा देव येथील शिवलिंगात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे हे शिवलिंग ११ ते १२ व्या शतकातील असावे, असा दावा अभ्यासक ठाकूर यांनी केला.
अन्यथा अनेक पिढ्यांचे नुकसान
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुन्या वास्तु, वस्तु, शिल्प, मंदिरे आणि अन्य साधने मिळत आहे. याबाबत काही दिवस चर्चा होते. मात्र हा वारसा जपण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून बेसिक प्रयत्न केले जात नाही, याबाबत विचारले असता अशोकसिंह ठाकूर म्हणाले, इतिहास विसरणे आणि नष्ट होणे हे काही एका पिढीचे नव्हे तर अनेक पिढ्यांचे आणि संपूर्ण मानवी विकासक्रमातील ऐतिहासिकताच गमावणे होय. असे कदापि घडू नये असे मत आहे.
ऐतिहासिक वारशाचे मूल्य ओळखावे
चंद्रपूर जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा जपण्याची आणि अधिक सखोल उत्खनन व संशोधन करून वर्तमानातील त्याचे महत्त्व सातत्याने नवीन पिढीसमोर अधोरेखित करण्याची गरज आहे. हे काही कुणा एकट्या संशोधकाचे काम नाही. त्यासाठी शासन, प्रशासन तसेच सर्व सजग नागरिकांनी या ऐतिहासिक वारशाचे मूल्य ओळखून दीर्घकालीन उपक्रमशील धोरण आखण्याची गरज आहे, असेही संशोधक ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
ं