चंद्रपूर : मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा निर्वाणीचा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद मेहरकुरे यांची उपस्थिती होती.राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. ते दिल्यास केवळ कुणबी समाजावरच अन्याय होणार नसून संपूर्ण ओबीसी समाजावर हा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जनगणना करा
बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. राज्य सरकारने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील. ओबीसीविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आगामी निवडणुकांत मतदान करतील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने दिला आहे.
लाठीमार घटनेचा नोंदविला निषेध
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरु आहे.या ठिकाणी उपस्थित जमावावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्याचाही विदर्भ तेली समाज महासंघाने यावेळी निषेध केला.