लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या नगरपरिषदेच्या ३१ कोटी रुपये किमतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पिण्याचे पाणी का नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागभीड नगरपरिषदेची स्थापना ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. नगरपरिषदेत परिसरातील ११ गावांचा समावेश करण्यात आला. उन्हाळ्यात या गावात दरवर्षी पाण्याची मोठी टंचाई असते. नागभीड शहरालाही तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. तपाळ पाणीपुरवठा योजना १९९९ मध्ये अस्तित्वात आली. वर्तमान परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करण्यास तपाळ योजना असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहरात आणि नगरपरिषदेत समावेश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागभीड नगरपरिषदेने या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार शासनाकडे सादर करण्यात आले.
गळतीने पाणीपुरवठा ठप्पउन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची पातळी खालावली. अशा परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजनाच मदतीला आहे. मात्र, भिकेश्वरजवळील गळतीने सोमवारपासून पुरवठा बंद झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाल्याचे दिसून येत आहे
टंचाईच्या काळात भ्रमनिरासघोडाझरी तलावातून ही योजना कार्यान्वित होणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांत २६ किमी पाइपलाइन आहे. योजनेत ९ पाण्याच्या टाकी आहेत. या टाक्यांचे काम पूर्ण झाले. जलशुद्धीकरण केंद्र व गावातील पाइपलाइन पूर्ण झाले. गावातील नळजोडण्यांचेही काम पूर्ण झाले. मग योजना कार्यान्वित करण्यास अडचण कोणती, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उन्हाळ्यात नवीन योजनेचे पाणी मिळेल, अशी नागभीडकरांची अपेक्षा होती. मात्र, भ्रमनिरास झाला आहे.
तीन टँकरने पाणीपुरवठा गळतीमुळे तपाळ योजना बंद झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून नगरपरिषदेने शहरात तीन टँकर लावले, पण अनेकांना पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, राममंदिर चौक, रेल्वे क्रॉसिंग आणि पोलिस ठाण्याच्या जवळ काही बांधकाम अद्याप शिल्लक आहे. हे काम झाल्यानंतर योजना कार्यान्वित केली जाईल.- उमेश शेंडे, अभियंता, न.प. नागभीड.