लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जीएसटी पात्र दुकानदारांच्या निकषांमध्ये भिन्नता असू शकते. पात्र दुकानदारांनी स्वतः बिल देणे अपेक्षित आहे. जर दुकानदार घेतलेल्या साहित्याचे बिल देत नसेल तर त्यासंदर्भात तक्रार करा. या तक्रारीच्या आधारावर संबंधितावर कारवाई केली जाईल, असे वस्तू व सेवाकर विभागाचे राज्यकर उपायुक्त (प्रशा) मुकेश कुमार राठोड यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीच्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अनेक दुकानदार वस्तू खरेदी केल्यानंतर कायद्यानुसार योग्य बिल ग्राहकांना देत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणुकीची शक्यता असते. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य नंदिनी चुनारकर यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांना पाठविलेल्या उत्तरात तक्रार करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.
बिल देणे बंधनकारकवस्तू व सेवाकर कायदा २०१७ मधील तरतुदीनुसार व्यवसायाला ठरावीक वार्षिक उलाढालीनुसार दुकानदार जीएसटी संकलन करणे व बिल देण्यास पात्र ठरतो. ठरावीक रकमेच्या किमतीच्या व्यवहाराकरिता बिल देणे बंधन- कारक असते.
येथे करा तक्रारग्राहकांना दुकानदारासंदर्भात तक्रार करायची असेल तर अशा वेळी वस्तू व सेवाकर कार्यालय दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, चंद्रपूर येथे तक्रार नोंदविता येईल.