संजय अगडे
तळोधी बा.(चंद्रपूर) : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जगभरात १८ कोटींच्या वर लोक बाधित झाले. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूला रोखण्यासाठी सरकारच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत; मात्र ग्रामीण भागातील जनता अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे. या पार्श्वभूमीवर नागभीड तालुक्यातील पळसगाव खुर्द ग्रामपंचायतीने ठराव घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन व ग्रामपंचायतीच्यावतीने दिले जाणारे दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, अशा आशयाचे पत्रकच काढले आहे.
शासनाने कोविड विषाणूजन्य आजाराचा सामना करण्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस वयाच्या १८ ते वृद्धापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. एक डोस लस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या विविध प्रकारावर व्हॅक्सीन लस पूर्णताः परिणामकारक ठरते आहे; मात्र नागभीड तालुक्यात येत असलेल्या पळसगाव खुर्द येथील नागरिकांना लस घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले असता, फक्त ३० ते ३५ लोकांनीच लस घेतली. व्हॅक्सिनपासून धोका होऊ शकतो, गैरसमज झाल्याने काही नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत. अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. आपल्या गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी पळसगाव खुर्दचे सरपंच बालु सिद्धमशेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन धान्य व ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार नाहीत, असा ठराव पारित केला. हा ठराव उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी, नागभीड तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पाठविला आहे.