लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारू, वाळू, हातभट्टी, गुटखा माफिया अशा विविध गुन्ह्यातील आरोपींची भाईगिरी उतरविण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मागील सहा महिन्यात भाईगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा १६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर, तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच ६५ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे भाईगिरीचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
जिल्ह्यात शांतता राहावी, म्हणून उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तर, अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळच्या वेळी सर्व गुंड, गुन्हेगारांची कुंडली काढली जाते. ज्यांच्यावर गंभीर व अधिक गुन्हे आहेत, अशांचा प्रस्ताव संबंधित पोलिस ठाण्यांकडून पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. मागील सहा महिन्यात १६ जणांना तडीपार करण्यात आले आहेत. तर, तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत दोन वर्षासाठी कारागृहात टाकले आहे. ही कारवाई पुन्हा सुरूच असल्याने जिल्ह्यातील आणखी काही गुन्हेगार तडीपार होणार आहेत.
६५ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत प्रलंबितगुन्हेगारांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिस स्टेशनच्या मार्फत पोलिस अधीक्षकांना त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत असते. त्यांनी प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तडीपार किंवा एमपीडीए कारवाई करण्यात येते.जिल्हाधिकाऱ्यांकडे ६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
एलसीबी अॅक्शन मोडवरचंद्रपुरात गोळीबाराच्या घटना झाल्यानंतर गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्याच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
१६ जण तडीपारमहाराष्ट्र पोलिस कायदा ५५ अंतर्गत पोलिस अधीक्षक गुन्हेगाराला हद्दपार करू शकतात. मागील सहा महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याने १६ जणांना तडीपार करण्यात आले
तीन एमपीडीएगंभीर गुन्हे करून दहशत माजविणाऱ्या गुंडांना चंद्रपूर पोलिसांनी थेट कारागृहात पाठविले आहे. मागील सहा महिन्यात आतापर्यंत तीन गुंडांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे.
"जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहावी, तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसावा, या अनुषंगाने पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत. मागील सहा महिन्यात १६ जणांना तडीपार तर तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हाभरात पोलिसांची ही विशेष मोहीम सुरूच राहणार आहे."- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर