वसंत खेडेकर।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : सलमान खान याने राज्याचे वन, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यात शोभीवंत असलेली, चंद्रपूर जिल्ह्यात बनविलेली वस्तू मागितली. ना. मुनगंटीवार, ती वस्तू सलमानला देण्यास तयार झालेत. पण, एक अट घातली. ही वस्तू हवी असेल तर तुम्हाला आमच्या बल्लारपूरला यावे लागेल. तेथे ही वस्तू तुम्हाला भेट म्हणून देऊ. आता, यावर सलमान खान काय बोलणार?झाले असे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सलमान खान हा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्याकरिता त्यांच्या बंगल्यावर गेला होता. त्या भेटीत दोन तास बसून सलमानने ना. मुनगंटीवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली बांबू हस्तकला केंद्रात बांबूपासून बनविलेला तिरंगा ध्वजा सलमानला तेथे दिसला. बांबूपासून बनविलेली ही आकर्षक वस्तू सलमानला खूप आवडली. याची प्रशंसा करीत सलमानने ही वस्तू मला द्या, अशी मागणी ना. मुनगंटीवारांकडे केली. त्यावर ना. मुनगंटीवार एक अट पुढे ठेवत सलमानला म्हणाले, ‘ही वस्तू तुम्हाला देतो. पण, ती स्वीकारण्याकरिता तुम्हाला बल्लारपूरला यावे लागेल.’उल्लेखनीय असे की अशीच अट त्यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता व निर्देशक सुभाष घई यांच्यापुढे ठेवली. काही दिवसांपूर्वी सुभाष घई हे ना. मुनगंटीवार यांना भेटण्याकरिता त्यांच्या बंगल्यावर गेले होते. बंगल्यात, हुबेहुब वाघ वाटावा, अशी प्रतिकृति अर्थात पुतळा ठेवलेला आहे. हा पुतळा घई यांना खूप आवडला. असा जीवंतपणा असलेला पुतळा आपल्याही घरी असावा या इच्छेने त्यांनी ‘असा एखादा पुतळा मला मिळेल का?’ अशी विचारणा ना. मुनगंटीवार यांना केली. होकार देत मुनगंटीवार म्हणाले, तुम्हाला हा पुतळा मिळेल; पण, तो स्वीकारण्याकरिता तुम्हाला बल्लारपूरला यावे लागले...! ही अट तर त्यांना घातलीच, सोबतच मुनगंटीवार घर्इंना म्हणाले- ‘आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात चांगले कसलेले कलावंत आहेत. चित्रीकरणाकरिता ताडोबासारखे प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथे येऊन आमच्या जिल्ह्यातील कलावंतांना आपल्या चित्रपटात अभिनयाची संधी द्या आणि आमच्या जिल्ह्यात चित्रपटाचे चित्रीकरणही करा, अशी सूचना केली. ‘मी हल्ली चित्रपट बनविणे बंद केले आहे. पुढे चित्रपट बनविण्याचा विचार झालाच तर तुमची सूचना निश्चित अमलात आणू’ असे घई म्हणाले. मुनगंटीवार यांना आपल्या क्षेत्रातील कलावंत तसेच येथील कला-सौंदर्य यावर किती प्रेम व आपुलकी आहे, हे यावरून दिसून येते. बल्लारपुरातील एका कार्यक्रमात ना. मुनगंटीवारांनीच हे दोन्ही प्रसंग सांगितले.
भेटवस्तू हवी असेल, तर बल्लारपूरला या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:11 PM
सलमान खान याने राज्याचे वन, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यात शोभीवंत असलेली, चंद्रपूर जिल्ह्यात बनविलेली वस्तू मागितली. ना. मुनगंटीवार, ती वस्तू सलमानला देण्यास तयार झालेत.
ठळक मुद्देजिल्ह्यातील कलावंतांना संधी द्या : सुधीर मुनगंटीवार यांची अभिनेता सलमान खानपुढे अट