घुग्घुस : गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे व लोकसंख्या सुद्धा सतत वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला आहे.या वाढत्या लोकसंख्येला त्यांच्या हक्काच्या मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होत नसेल तर गावाचा विकास खुंटल्यासारखा वाटतो. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक नगर निर्माण होत असून जमिनीचे भावसुद्धा गगनाला भिडले आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीचे व शहरीकरणामुळे पाणी टंचाई, वीज टंचाई, रस्ते, पार्किंगसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे. ही समस्या भेडसावल्याच्या आधीच नियोजन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन झाले आहे. गावात शासनाच्या महत्वाच्या ज्या योजना आहे, त्यात निर्मल ग्राम स्वच्छता, अनुदानावर शौचालय, राजीव गांधी जीवन दायी योजना इंदिरा आवास योजना, अशा बऱ्याच योजना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहे. त्या राबविणे, गावाचे टाऊन प्लॉनींग हे भविष्याकरिता अत्यंत महत्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आतील-बाहेरील अतिक्रमण वाढले आहे. आज घुग्घुसची लोकसंख्या ५० हजारापर्यंत पोहचत आहे. या ५० हजाराच्या नागरिकांना मुलभुत सोई पुरविणे हे देखील गरजेचे आहे.जुन्या घुग्घुस गावापेक्षा आज सीमा वाढल्या आहेत. तीन ते चार कि.मी. पर्यंत नविन नगरे तयार झालीत व पुढेही तयार होऊन सीमा पुन्हा वाढतील. शहराचे विस्तारीकरण हीसुद्धा गरज आहे. मुलभूत सोईकरीता लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरीता प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात घुग्घुसचा विकास, गावातील रस्ते झाले. काही प्रमाणात पाणी पुरवठा योजना राबविल्या गेली. परंतु गेल्या १० वर्षात घुग्घुसचा विकास खुंटला असल्याचीी खंत सुुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.आज घुग्घुसच्या नागरिकांना पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. चार-पाच दिवसातून एकदा पााणी पुरवठा होतो. हाकेच्या अंतरावर दोन मोठ्या नद्या आहे, तरी घुग्घुस गाव पाण्याविना तहानलेलेच आहे. पाण्याची योजना आहे. ती कुचकामी ठरत आहे. तसेच आठवडी बाजारातील व गावातील केरकचरा यांची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रा.पं. विडों कंपोस्टींग हा कचऱ्याला वेगळा करणारा व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प जसा भद्रावती न.प. उभारला त्या धरतीवर राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.घुग्घुस ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येणे हीसुद्धा गरज झाली आहे. आज घुग्घुसची ओळख सर्वत्र आहे. परंतु विकासापासून आजही कोसो दूर आहे. तेव्हा या नागरिकांच्या मुलभूत सोई चांगल्याप्रकारे कशा उपलब्ध करून देता येईल. याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)
दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला
By admin | Published: June 28, 2014 11:30 PM