तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरात येत असलेल्या खांबाडा शिवारात माती उत्खनन करण्यासाठी लीज येण्यात आली आहे. उत्खनन करताना लीजमधील अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पण संबंधित परवानाधारकाने नियमाला केराची टोपली दाखवून महाकाय खड्डे खोदल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सध्या या शिवारात तीन खड्डे खोदण्यात आले आहे. यातील दोन खड्डे खोदताना अक्षरशः अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. लांबी अंदाजे १०० फूट असून, रुंदी ७० ते ७५ फूट एवढी आहे व खोदकाम ५० ते ५५ फुटापर्यंत करण्यात आले आहे. या महाकाय खड्ड्यातून हजारो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संबंधित परवानाधारकाने मनमानी पद्धतीने खोदकाम केल्याचे दिसून येत आहे. ही माती रेल्वेच्या कामात वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या महाकाय खड्ड्याचे मोजमाप केल्यास मातीचे मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परवान्यापेक्षा जास्त मातीचे उत्खनन केल्याने लाखोंच्या महसुलावर पाणी फेरल्याचा प्रकार उघड्यावर आला आहे.
===Photopath===
140621\img-20210614-wa0048.jpg
===Caption===
शेतशिवारात उत्खनन