मूल (चंद्रपूर) : जुनासुर्ला येथे खताची अवैध साठवणूक करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून कृषी विभागाने सोमवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास धाड टाकून तब्बल ५ लाख १९ हजारांचे खत जप्त केले. हे खत जेके फर्टीलायझर आनंद गुजरात या कारखान्यातून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी विक्रेत्याला अटक करण्यात आली. अमोल प्रल्हाद मडावी (३०) रा. पंचाळा, ता. राजुरा असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अमोल मडावी हा मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील वासुदेव समर्थ यांच्या घरी खताच्या ३४६ पोते साठवणूक करून शेतकऱ्यास विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने व पोलिसांनी जुनासुर्ला येथे छापा टाकला असता घरात भूमीरस ऑरगॅनिक फर्टीलायझरचे ३४६ पोते आढळले. या खताची किंमत ५ लाख १९ हजार रुपये आहे. समर्थ यांनी हे खत कुणाचे याची माहिती दिल्याने याप्रकरणी आरोपी अमोल मडावी याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ६ व खंड २२ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे खंड ३ (२, अ,ब,क) आणि भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत, तालुका कृषी अधिकारी किशोर चौधरी, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे, मूलचे ठाणेदार सुमित परतेकी, कृषी पर्यवेक्षक पंजाबराव राठोड, कृषी सहायक विनोद निमगडे यांनी केली.
दलालांचे धाबे दणाणले
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत मनमानी दराने गावातच खत विक्री करणारे दलाल सक्रिय झाले आहे. मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाण्यांची विक्री जोरात आहे. या कारवाईने अवैध खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे. गतवर्षी असा प्रकार नव्हता. यंदा पहिल्यांदाच गावागावांत दलाल सक्रिय झाल्याने सामान्य शेतकरी त्यांच्या गळाला लागत आहेत.
कृषी विभागाच्या भरारी पथकाने ५ लाख १९ हजारांचा अवैध खतसाठा जप्त केला. विक्रेत्याकडे कोणतेही परवाने नव्हते. जप्त खताचा नमुना काढून परीक्षणासाठी अमरावती येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
-किशोर चौधरी, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, मूल