प्रचाराचे पाच दिवस शिल्लक : चंद्रपूर शहर हद्दीबाहेर पोलीस चौक्याचंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीची धामधूम आता सर्वच प्रभागात, गल्लीबोळात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांसोबत अपक्ष उमेदवारांचा प्रचार आता जोमात आला आहे. दरम्यान, ही निवडणूक दारूविरहित करण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. शहर हद्दीबाहेर तपासणी नाके उभारण्यात आले असून २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे.महानगरपालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. निवडणूक म्हटली की साम-दाम-दंड याचा वापर ठरलेलाच असतो. या निवडणुकीतही प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही स्थिती उदभवण्याची शक्यता आहे. आता प्रचाराला केवळ पाचच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तिव्र उन्हाची तमा न बाळगता उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. गल्लीबोळात प्रचाराचे ध्वनीक्षेपक वाजत आहेत. यासोबतच मतदारांपर्यंत डोअर टू डोअर जाऊन प्रचाराचे पॉम्प्लेट वाटण्यात येत आहे. तरुणाईची शक्ती उमेदवारांनाही माहित आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार तरुणाईची फळी आपल्या कंपूत घेण्यासाठी धडपडत आहे. तरुणांना खूश करण्यासाठी काही उमेदवारांकडून रात्रीच्या जेवणाची मेजवाणी दिली आहे. त्यानंतर याच तरुणांकडून सोशल मीडीयाद्वारे प्रचार करविला जात आहे.विशेष म्हणजे, नव्या प्रभाग पुनर्रचनेत प्रभागाच्या सीमा वाढविण्यात आल्याने लोकसंख्याही वाढली आहे. यामुळे जुन्या उमेदवारांचीच दमछाक होत असून नव्या उमेदवारांसमोर कमी दिवसात मतदारांपर्यंत कसे पोहचावे, हेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संपूर्ण प्रभागभर फिरण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)ईव्हीएम मशिनची प्राथमिक तपासणीमतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत अनेक उमेदवार व राजकीय पक्ष सांशक आहेत. यात घोळ होण्याची शक्यता काही उमेदवारांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने आज बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व उमेदवारांना पाचारण करून त्यांच्या समक्ष इव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी करून घेतली. यावेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांसह मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर उपस्थित होते. मशीनमध्ये मतदानपत्रिका कशी टाकली जाते, प्रत्यक्ष मतदान कसे होते, याबाबत माहिती देण्यात आली. दोन दिवसानंतर पुन्हा प्रत्यक्ष मतदान पत्रिका टाकून मशिनची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळीदेखील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व उमेदवारांना पाचारण करण्यात येणार आहे.
अवैध दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: April 13, 2017 12:37 AM