पत्रकार परिषदेत माहिती : उपोषणाचा इशाराचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याची माहिती नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.माहिती देताना व्यंकटेश एकरे म्हणाले, भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील आपल्या मालकीची जमीन चंद्रकांत वासाडे नामक यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्ट्याने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नुतनीकरण झाले नाही. याचाच फायदा घेत सन २००० मध्ये चंद्रकांत वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतात खनन करण्यासाठी एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून खनन सुरू केले. ही बाब जेव्हा आपल्या लक्षात आली तेव्हा खनिकर्म विभागाला पत्र देवून खनन थांबविण्याची विनंती केली. परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे एकरे यांनी सांगितले. यानंतर चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. शेतीचे दस्ताऐवज खासगी व सरकारी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यात आले. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार आपले हस्ताक्षर नसल्याचे सिद्ध झाले. भाडेपट्ट्यावर केलेले हस्ताक्षर वासाडे व त्यांचे व्यवस्थापक सुधेश पाल यांचे असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार आपण वरोरा पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २००२ ला पहिली तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. २७ जुलैला पुन्हा तक्रार केल्यानंतर एफआरआय दाखल करून मोका चौकशी करण्यात आली. त्यानंतर फौजदारी खटला सुरू झाला व निकाल आपल्या बाजूने लागला, असे एकरे यांनी सांगितले.अनेक प्रयत्नानंतरही चंद्रकांत वासाडे हे जमिनीचा ताबा देण्यास नकार देत असून प्रशासनही त्यांना पाठबळ देत आहे. नियमाप्रमाणे जमिनीचा आपण शेतसारा भरत असून २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा देण्याचा निर्णय दिला. मात्र या निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे माझ्या मालकीच्या शेतात ५० फुटापर्यंत खोल अवैध खनन केले जात आहे. याबाबत लोकशाही दिनातही तक्रार नोंदविण्यात आली. दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मी हतबल झालो असून प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय मिळूवन द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेवर अवैध खनन
By admin | Published: April 07, 2017 12:58 AM