पाटबंधारे विभागाचा आदेश धुडकावला : प्रकल्पग्रस्त वहिवाटीपासून वंचितवरोरा : चारगाव धरणाच्या गाळपेळ जमिनीवर कुठल्याही प्रकारे मशागत करुन पिके घेवू नये, असा आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही अनेकांनी आंतर मशागत करुन बेकायदेशीर वहिवाट सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत, ते प्रकल्पग्रस्त वहिवाट करण्यापासून वंचित झाले आहेत.सन १९७६ मध्ये चारगाव धरणाकरिता वरोरा तालुक्यातील राळेगाव, चारगाव, अकोला, सावरी, उमरी आदी गावातील जमिनी पाटबंधारे विभागाने त्यावेळी मोबदला देवून ताब्यात घेतल्या. चारगाव धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गाळयुक्त जमिन रब्बी हंगामामध्ये वहिवाट करण्याकरीता प्रकल्पग्रस्तांना देण्याचा शासन निर्णय झाला आहे. परंतु, काही शेतकरी मुजोरीने गाळमुक्त जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून पीके घेत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने गाळयुक्त जमिनीवर कुणीही वहिवाट करु नये, असे आदेशही बजाविले आहे. तरीपण या जमिनीवर पीके घेणे सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गाळयुक्त जमिनी वहिवाट करण्याकरीता देण्याच्या मागणीकरीता प्रकल्पग्रस्त शेतकरी अधिकारी व प्रतिनिधींना साकडे घालीत आहे. परंतु त्यांंना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व गाळयुक्त जमिनीची वहिवाट करणाऱ्यांमध्ये भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चारगाव धरणातील गाळयुक्त जमीन प्रकल्पग्रस्तांना रब्बी हंगामामध्ये वहिवाट करण्याकरीता देण्यात यावा असा शासन निर्णय झाला आहे. परंतु, या जमिनीचे वाटप महसूल विभाग की पाटबंधारे विभाग करणार, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी संकटात सापडले आहेत. इतर शेतकऱ्यांनी मात्र या जमिनीवर अतिक्रमण करून पीक लागवडीसाठी वहिवाट सुरू केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
चारगाव धरणाच्या जागेवर बेकायदेशीर वहिवाट
By admin | Published: December 10, 2015 1:22 AM