सुशी दाबगाव: मूल तालुक्यातील चिरोली-सुशी मार्गावरील अंधारी नदीतून वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेतीचे अवैधरित्या उत्खनन सुरु आहे. आर्थिक तडजोडीतून रेती भरलेले ट्रॅक्टरला सोडले जात असतानाच नलेश्वर-सुशी घाटावरुनही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या सुशी-दाबगाव या गावालगत अंधारी नदी वाहते. याचा फायदा घेत काही रेती माफियांनी रात्री व पहाटेच्या सुमारास रेतीचे अवैध उत्खनन गेल्या अनेक महिन्यापासून सुरु केले आहे. बांधकामाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासनाने रेती घाटांचे अद्यापही लिलाव केलेले नाही. तर लिलाव होऊनही टीपीचा खर्च किंवा दर परवडणारे नसल्याचे कारण समोर करुन काही ट्रॅक्टर आणि ट्रक मालकांनी आपला मोर्चा अवैध रेती उत्खननाकडे वळविला आहे. कमी खर्चात जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासेपोटी ट्रॅक्टर आणि ट्रक मालकांनी रस्ता तयार करुन सुशी दाबगाव जवळून जाणऱ्या अंधारी नदीतून आणि नलेश्वर घाटावरुन रेती तस्करी सुरु आहे. चिरोली, टोलेवाही, खालवसापेठ, कांतापेठ, उथळपेठ नलेश्वर, देहगाव, मानकापूर, चिचाळा हळदी आदी गावात रेतीची अवैध वाहतूक होत असून चोरीचा व्यवसाय चांगलाच तेजीत सुरु आहे. अंधारी नदीतून सुशी, नलेश्वर घाटावरुन नलेश्वर मार्गावरुन रेतीची अवैध तस्करी केली जात असतानाही त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही तालुका प्रशासन करीत नाही. यामुळे शासनाच्या लाखोचा महसूल पाण्यात बुडत आहे.रेतीचे अवैध उत्खनन तलाठ्याच्या व वनविभागाच्या आशिर्वादाने सुरु असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांत सुरु आहे. अधिकारी व तस्करांचे आर्थिक सबंध असल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेती माफीया व तलाठी यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (वार्ताहर)
अंधारी नदीतून रेतीची अवैध वाहतूक
By admin | Published: January 07, 2015 10:51 PM