चंद्रपूर : ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून सावली पोलिसांनी चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी करून २५ जनावरांची सुटका केली. रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावली पोलिसांनी साडेबारा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. यंदाची सावली पोलिसांची ही अकरावी कारवाई आहे. बक्षीस सिंग मुक्तार सिंग (४२) रा. खदूरसाहिब जि. करणतारण पंजाब), मोहम्मद आरिश मोहम्मद कुरेशी (२२, रा. बनत, ता. जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
ट्रकमध्ये कोंबून जनावराची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच आपल्या पथकाच्या सहाय्याने चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळी सीजी ०४ जेबी ७६४९ क्रमाकांचा संशयित ट्रकला थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या ट्रकसह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर महा. पशुसंरक्षण अधिनियम, प्राणी छळ प्रति. अधि, महा. पोलीस अधि., मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सावली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धीरज पिदूरकर यांनी केली.